निवडणूक तयारीला वेग, मतमोजणीचे आज प्रशिक्षण

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी वाहने नियुक्त विविध अधिकारी- कर्मचा-यांच्या पथकांच्या प्रशिक्षणासह आवश्यक सामग्री, वाहने अधिग्रहण, मतमोजणीस्थळी आवश्यक सुविधा आदी तयारीला वेग आला आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी- कर्मचारी यांचे उद्या (26) सकाळी अकराला नियोजनभवनात प्रशिक्षण होणार आहे.
मद्यविक्रीला प्रतिबंध
निवडणूक खुल्या, मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई करणारा आदेश सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला. मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तासांच्या अगोदरपासून, तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री व कोरडा दिवस जाहीर करण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी श्री. नवाल यांनी आदेश पारित केले आहेत. त्यानुसार मतदानापूर्वीचा दिवस अर्थात 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजतापासून ते 30 नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवस पुढे, मतदानाचा दिवस 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत व मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर रोजी मतमोजणी संपेपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
अंध मतदारांना मदतनीस परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना
निवडणुकीत अंध मतदारांना मतदान सहायक देण्याची तरतूद आहे. त्यासाठी मतदाराने तीन दिवस आधी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. असा अर्ज प्राप्त झाल्यावर निवडणूक निर्णय अधिका-यांनी मदतनीस नेमण्याची परवानगी द्यावी व मतदानाच्या दिवशी अंध मतदाराने व मदतनीसाने घोषणापत्र मतदान केंद्राध्यक्षाला देणे आवश्यक आहे. मतदान केंद्राध्यक्ष अंध मतदाराला मदतनीसाच्या सहाय्याने मतदान करू देईल, अशी तरतूद आहे. मदतनीस नेमणुकीचा अर्ज सादर करणे व परवानगी मिळविणे आदी बाबींसाठी अंध मतदाराला निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात येण्याची गरज पडू नये म्हणून अर्ज तपासणे व परवानगी अधिकार आता सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत. तसा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह यांनी जारी केला.
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह पथक रवाना करण्याकरिता, तसेच मतदान प्रक्रिया संपल्यानंतर जिल्हास्तरावर नेमून दिलेल्या ठिकाणी मतदान साहित्य पोहोचविण्यासाठी वाहतूक आराखड्यानुसार वाहने अधिग्रहित करण्याचे निर्देशही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जिल्हा निवडणूक अधिका-यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी- कर्मचा-यांना, तसेच इतर मनुष्यबळाला ओळखपत्रे देण्याची जबाबदारी लेखा अधिकारी रवींद्र जोगी यांना देण्यात आली आहे. मतमोजणी स्थळी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधींना भोजन व्यवस्थेकरिता स्वतंत्र मंडप, पाण्याचे टँकर आदी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व व्यवस्थेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, निरीक्षण अधिकारी संजय आवारे, निखील नलावडे, वैभव खैरकार यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती