महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी -जिल्हाधिकारी पवनीत कौर

                 


       

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी

-जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती दि. 13 : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना ही महत्त्वाकांक्षी योजना शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे . या योजनेच्या 16 हजार 193 लाभार्थ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी त्वरित आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे .

            बँकांनी योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या माहितीचे ऑनलाइन प्रणालीद्वारे संस्करण करून पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या याद्या संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी संस्था कार्यालय , संबंधित बँक शाखा, तहसीलदार कार्यालय , सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

            पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे भेट देऊन आपल्या विशिष्ट क्रमांकाच्या अनुषंगाने कर्ज खात्याचा आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जाताना आपले आधारकार्ड, विशिष्ट क्रमांक, बँक पासबुक अशी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावी. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र संचालकामार्फत लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आधार प्रमाणीकरण करताना लाभार्थ्यांना अडचणी येत असल्यास, त्याबाबत ऑनलाईन तक्रार प्रणालीद्वारे पोर्टलवर आपली तक्रार दाखल करता येईल.

लाभार्थ्यांना त्यांचा विशिष्ट क्रमांकासमोर नमूद आधार क्रमांक, तसेच लाभाची रक्कम अमान्य असल्यास ऑनलाइन प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार दाखल करता येईल. लाभार्थ्यांना त्यांच्या अंगठ्याचे ठसे येत नसल्यास अथवा आधार प्रमाणीकरण करणे शक्य होत नसल्यास त्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे तालुकास्तरीय समितीकडे तक्रार दाखल करता येईल.

            जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समितीकडे दाखल केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांच्या तक्रारी या ऑनलाइन पद्धतीने निकाली काढण्यात येतील. बँकांनी अपलोड केलेल्या माहितीप्रमाणे योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांच्या याद्या नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असून योजनेच्या निकषानुसार पात्र असणारा कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती