Monday, October 10, 2022

संत्रा फळबागधारकांना सहभागासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

 संत्रा फळबागधारकांना सहभागासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत 

आंबिया बहारासाठी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती, दि. 10 - विभागातील पाचही जिल्ह्यांत आंबिया बहारासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी बांधवांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. नुकसानीच्या परिस्थितीत आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी अधिकाधिक शेतकरी बांधवांनी योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी केले आहे.

यंदा आंबिया बहारासाठी संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फळपीकांसाठी विमा योजना लागू आहे. फळपीकासाठी २० हेक्टरहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र असलेल्या महसूल मंडळांना अधिसूचित करून ही योजना राबवली जाते. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू होते. त्यानुसार फळपिकाचे उत्पादनक्षम वय संत्रा व मोसंबी पीकाचे ३ वर्ष, डाळिंब व द्राक्ष पिकाचे २ वर्ष व आंबा पिकाचे ५ वर्ष असणे आवश्यक आहे. 

अमरावती, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. व बुलडाणा जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी  नियुक्त करण्यात आली आहे.

                       संत्रा फळबागधारकांना सहभागासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

संत्रा फळपीकासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांचा समावेश आहे. संत्र्यासाठी प्रतिहेक्टर विमा संरक्षित रक्कम नियमित हवामान धोक्यासाठी 80 हजार रू., तर गारपीटीसाठी 26 हजार 667 रू. असून, हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 6 ते 14 हजार आणि गारपीटीसाठी 1 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. संत्रा फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 30  नोव्हेंबर आहे.

मोसंबीसाठी बुलडाणा, अमरावती व अकोला या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. मोसंबीसाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 80 हजार रू. व गारपीटीसाठी  26 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 4 हजार आणि गारपीटीसाठी 1 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. मोसंबी फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे.

डाळिंबासाठी बुलडाणा, वाशिम व अकोला या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. डाळिंबासाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 1 लाख 30 हजार रू. व गारपीटीसाठी  43 हजार 333 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर साडेसहा हजार ते 28 हजार 600 रू., आणि गारपीटीसाठी 2 हजार 167 रू. हप्ता भरावयाचा आहे. डाळिंब फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 14 जानेवारी आहे.

केळीसाठी बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. केळीसाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 1 लाख 40 हजार रू. व गारपीटीसाठी  46 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 7 हजार ते 9 हजार 100 रू., आणि गारपीटीसाठी 2 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. केळी फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे.

 

आंब्यासाठी बुलडाणा व वाशिम या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. आंब्यासाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 1 लाख 40 हजार रू. व गारपीटीसाठी  46 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 15 हजार 400 ते 16 हजार 100 रू., आणि गारपीटीसाठी 2 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. आंबा फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे.

द्राक्षासाठी केवळ  बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. द्राक्षासाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 3 लाख 20 हजार रू. व गारपीटीसाठी  1 लाख 6 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 16 हजार रू., आणि गारपीटीसाठी 5 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. द्राक्ष फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर आहे.

 

पपईसाठी अमरावती व वाशिम या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. पपईसाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 35 हजार रू. व गारपीटीसाठी  11 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 1 हजार 750 रू., आणि गारपीटीसाठी 583 रू. हप्ता भरावयाचा आहे. पपई फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे.

 

 

 

 

या योजनेत अधिसूचित क्षेत्रातील कुळाने, भाडेपट्टीने शेती करणारा शेतक-यांसह सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.  एकापेक्षा अधिक फळपीकांसाठी सहभाग घेता येतो. एका वर्षात एका फळपिकासाठी एका क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी अर्ज करता येईल. एक शेतकरी चार हेक्टर मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो. आंबिया बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करिता विमा पोर्टल(https://pmfby.gov.in)या संकेतस्थळास भेट द्यावी. सीएससी सेंटरमार्फत अर्ज करता येईल. रिलायन्स विमा कंपनीचा संपर्क क्र. (022) 68623005 व ग्राहक सेवा क्र. 1800 1024 0888 असा आहे. एचडीएफसी ॲग्रो विमा कंपनीचा संपर्क क्रमांक (022)  62346234 व टोल फ्री क्रमांक 1800 266 0700 असा आहे. भारतीय कृषी विमा कंपनीचा संपर्क क्र. (022) 61710912 व टोल फ्री क्र. 1800 116 5515 असा आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. मुळे यांनी केले.

000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...