महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेतील सादरीकरणाचा टप्पा यशस्वी करा जिल्हाधिकारी पवनीत कौर







 

महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेतील सादरीकरणाचा टप्पा यशस्वी करा

जिल्हाधिकारी पवनीत कौर

      अमरावती, दि. 6 : नव उद्योजकांच्या अभिनव संकल्पनांना मूर्तरूप मिळून उद्योजकतेचा विकास व्हावा या हेतूने महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा 2022 अंतर्गत‍ जिल्हा प्रशिक्षण व सादरीकरण स्पर्धा 14 ऑक्टोबरला होणार आहे. सर्व विभागांनी मिळून समन्वयाने हा उपक्रम यशस्वी करावा असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

            कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. कौशल्य विकास व रोजगार उपायुक्त सु.रा.काळबांडे, सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी के.एस. विसाळे, लीड बँक व्यवस्थापक जे. के. झा, 'आत्मा'च्या अर्चना निस्ताने, 'उमेद'चे सचिन देशमुख, डॉ. स्वाती शेरेकर आदी उपस्थित होते.

            जिल्ह्यातील उत्तमोत्तम संकल्पना राज्य पातळीवर पोहचून त्यांना यश मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावे. यात्रेचा प्रचार व प्रबोधानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा होणार आहे. त्यात अधिकाधिक संकल्पनांचा समावेश व्हावा. सादरीकरणाबाबत संबंधितांना चांगले प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

            स्पर्धेत जिल्हास्तरावर अनुक्रमे 25 हजार, 15 हजार व 10 हजार अशी पहिली 3 बक्षिसे देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावरील स्पर्धेत कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलीटी, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा व इतर क्षेत्राबाबत संकल्पना प्रकल्पांची निवड करण्यात येणार आहे. या प्रत्येक क्षेत्रासाठी पहिले पारितोषिक 1 लाख व दुसरे 75 हजार रुपये आहे तसेच सर्वेात्कृष्ट महिला उद्योजिका यांना 1 लाख रुपये देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. शेळके यांनी दिली.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती