हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप; अमरावतीच्या युवकाचे संशोधन महाराष्ट्र स्टार्टअप कार्यक्रमात कुशकुमार ठाकरे राज्यात सर्वप्रथम

 



हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप; अमरावतीच्या युवकाचे संशोधन

महाराष्ट्र स्टार्टअप कार्यक्रमात कुशकुमार ठाकरे राज्यात सर्वप्रथम

 

अमरावती, दि. 20 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता कार्यक्रमात अमरावतीचा कुशकुमार मनोहर ठाकरे हा युवक आरोग्य क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. हृदयविकाराबाबत कल्पना देणारे ‘पर क्ल्यू’ हे स्टेथॅस्कोपसारखे साधन कुशकुमार याने तयार केले असून, या शोधाबद्दल त्याला राज्यस्तरावरील एक लक्ष रूपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात समारंभपूर्वक पुरस्कार कुशकुमार यांना प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव मनिषा वर्मा,  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व आयुक्त डॉ. रामास्वामी आदी उपस्थित होते. राज्यस्तरावर 21 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यात कुशकुमार यांना आरोग्यहेल्थकेअर सेक्टरमध्ये प्रथम पुरस्कार देवून राज्यपाल यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.  

कुशकुमार हा अमरावतीच्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने ‘पर-क्ल्यू’ हे स्टेथॅस्कोपचे काम करणारे साधन निर्माण केले आहे. या संशोधनाला मनीष कुथरन यांचे सहकार्य व डॉ. शारदा देवरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ज्याप्रमाणे घरच्या घरी शर्करापातळी मोजण्यासाठी ग्लुकोमीटरचा वापर होतो, त्याचप्रमाणे ‘पर-क्ल्यू’ (परफेक्ट क्ल्यू) हे साधन वापरून हृदयाचे ठोके मोजण्याबरोबरच हृदयविकाराची पूर्वकल्पनाही मिळणार आहे. त्यामुळे रुग्णाला तातडीने उपचार घेता येतील. या साधनात रक्तदाबाची दैनंदिन नोंद होऊन त्याचा महिनाभराचा डेटाही सेव्ह व्हावा, यादृष्टीने आम्ही ते अधिक अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे कुशकुमार यांनी सांगितले. त्यामुळे डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाताना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.    

अमरावती येथे विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा शुभारंभ झाला. यात्रेत दि. 29 ऑगस्टपर्यंत प्रत्येक तालुका स्तरावर भेटी देऊन नाविन्यपूर्ण संकल्पना, त्याचे इतर पैलू याबाबतची माहिती, मार्गदर्शन व नोंदणी करण्यात आली. त्यानंतर दि. 14 ऑक्टोबरला गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा झाली. त्यात प्रथम क्रमांक मिळालेल्या कुशकुमारने राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धेतही हेल्थ केअर सेक्टरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.  

या यशाबद्दल जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी कुशकुमार यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके,  इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक स्वाती शेरेकर, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य व्ही. आर. मानकर, कौशल्य विकास अधिकारी वैशाली पवार आदी उपस्थित होते.

00000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती