माविमच्या सहकार्याने महिला सक्षमीकरण

 

माविमच्या सहकार्याने महिला सक्षमीकरण

* महिला बचतगटांच्या वस्तूंना नागरिकांची मागणी

अमरावती, दि. 2 : महिला बचत गटांच्या उत्पादनांना अमरावतीकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध प्रजातींच्या श्वानांचा समावेश असलेला 'डॉग शो', ड्रोन फवारणीसारख्या अत्याधुनिक यंत्रांची प्रात्यक्षिके यामुळे जिल्हा कृषी महोत्सवातील दुसरा दिवस लक्षणीय ठरला.

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा), महिला आर्थिक विकास महामंडळ व कारितास इंडिया यांच्या सहकार्याने सायन्सकोर मैदानावर प्राकृतिक कृषी, मिलेटस् व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. हा महोत्सव 5 मार्चपर्यंत चालणार आहे. यात भरडधान्यापासून तयार करण्यात आलेले पौष्टिक व चविष्ट पदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत. या पदार्थांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांच्या हस्ते 'डॉग शो'चा शुभारंभ झाला. अल्सेशियन, पामेरियन, लॅब्रॉडॉर, जर्मन शेफर्ड अशा विविध प्रजातींचे श्वान शोमध्ये सहभागी होते. हा शो पाहण्यासाठी श्वानप्रेमींनी, तसेच नागरिकांनी  आपल्या कुटुंबीयांसह मुलाबाळांसह उपस्थिती लावली.  

            ग्रामीण महिलांचे संघटन, त्यांची क्षमता बांधणी, उद्योजकता विकास यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून (माविम) काम केले जाते. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांचा उद्योजकीय विकास घडवून आणणे, त्यांना सातत्याने रोजगाराच्या संधी आणि बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येते. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची बाजारपेठेशी सांगड घालून देण्याचे काम माविममार्फत करण्यात येते. याच धर्तीवर जिल्हा कृषी प्रदर्शनामध्ये नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत स्वयंसहायता महिला बचत गटांनी येथे 46 स्टॉल्स लावले आहेत. यापैकी 40 स्टॉलवरती विविध हस्तकलेच्या वस्तू तसेच तयार खाद्य पदार्थ, धान्ये यांची विक्री सुरु आहे. तर उर्वरित सहा स्टॉल्सवरती महोत्सवातच खानावळीचे स्टॉल्स लागले आहेत.

बचत गटांमार्फत प्रयोगिक तत्वावर एलएडी दिव्यांची निर्मिती

            बरेचदा महिला बचतगट म्हटले की केवळ घरगुती खाद्य पदार्थांची निर्मिती व विक्री होत असावी, असे वाटते. परंतु आता महिला बचतगटांनी चाकोरी बाहेर जावून काम करणे सुरु केले आहे. यामध्ये त्या एलएडी दिव्यांची निर्मिती करण्याचे तांत्रिक काम करीत आहे. सक्षम लोक संचालित साधन केंद्र तिवसा व परिवर्तन लोकसंचालित साधन केंद्र भातकुली या बचत गटामार्फत एलएडी दिव्यांची निर्मिती करण्यात येते. हे एलएडी दिवे येथे विक्रीस उपलब्ध आहेत.  यामध्ये सर्किट सोल्डरिंग, बल्बच्या कॅपचे पंचींग, सर्किटमध्ये कॅपिसिटर्स जोडणे हे आव्हानात्मक वाटणारे काम प्रशिक्षणामुळे बचतगटातील महिला लिलया करतात. आजकाल एलएडी दिव्यांची मागणी लक्षात घेऊन महिला बचतगटांनी हा व्यवसाय स्वीकारला. या व्यवसायातून महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या एलएडी दिव्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांची मागणी वाढावी यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी या दिव्यांची खरेदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांची निर्मिती

            प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे कापडी पिशव्यांची मागणी सर्वत्र वाढत आहे. प्लास्टिकवर बंदी असल्यामुळे सर्वत्र खरेदीसाठी कापडी पिशवीची मागणी होत आहे. यासाठी माविममार्फत महिला बचतगटांनी कापडी पिशवींची निर्मिती उद्योग सुरु केला आहे. घरचे कामकाज सांभाळून रिकाम्या वेळेत गावातच महिला हा व्यवसाय करतात. यामध्ये दैनंदिन वापरामध्ये तसेच इतर कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या कापडी पिशवी माफक दरात उपलब्ध आहेत. या पिशवीची किंमत दहा रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत आहे. ही पिशवी संपूर्ण सुती कापडापासून बनविण्यात येत असून वस्तूचे वजन उचलण्याची क्षमता चांगली आहे. तसेच पिशवीची घडी छोटी होत असल्यामुळे ती सर्वत्र वागविता येते. यामुळे या पिशव्यांना सर्वत्र मागणी आहे. या व्यवसायामुळे आम्ही आर्थिक सक्षम झाल्याचे मत शारदा सातंगे या महिलेने व्यक्त केले आहे.

 

आकर्षक व देखण्या मातीच्या मुर्ती

            मारकामाय स्वयंसहायता महिला बचतगट, रिध्दपूर यांच्यामार्फत मुर्तीकाम व कुंभारकाम व्यवसाय चालविला जातो. दहा महिला एकत्रित येऊन मुर्तीकाम करतात. यामध्ये देवी-देवता, महापुरुषांच्या आकर्षक व सुबक मुर्त्या, पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बचतगटाला यापूर्वी ‘जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्कार’ही प्राप्त झाला आहे.

            बचतगटांमध्ये विविध सेंद्रीय डाळ, तयार पीठे, ओली हळद, गुळपट्टी, सिपना लोकसंचालित साधन केंद्र, बिहालीमार्फत मोहालाडू, मेळघाट लोकसंचालित साधन केंद्रामार्फत मोहाचिक्की, मोहा राजगिरा लाडू, लसूण पापड, मेथी पापड असे पौष्टिक पदार्थ वेगवेगळ्या चवींमध्ये उपलब्ध आहे. तसेच मेळघाट येथील प्रसिध्द रबडी ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहे. खाद्यान्नांच्या स्टॉलमध्ये मांडे, बासुंदी, झुनका भाकर केंद्र तसेच सकस आहार थाळी उपलब्ध आहे.

            संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील माविमचे ग्रामीण व शहरी भागात 7 हजार 578 बचतगट आहे. या बचतगटाच्या माध्यमातून 83 हजार महिलांना संघटित केले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंसहायता महिला बचतगटांनी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवामध्ये विविध खाद्य पदार्थांचे तसेच नित्योपयोगी वस्तूंचे स्टॉल्स लावले आहेत. कृषी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एक लाख रुपयांच्यावर विक्री करण्यात आली आहे. या बचतगटातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी कृषी महोत्सवाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन माविमचे सुनील सोसे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती