Thursday, March 2, 2023

महिला बचत गटांच्या ग्रामीण खाद्य पदार्थांना नागरिकांची मागणी

 

जिल्हा कृषी महोत्सव 2023

 

महिला बचत गटांच्या ग्रामीण खाद्य पदार्थांना नागरिकांची मागणी

* नागरिकांचा कृषी प्रदर्शनाला उत्फूर्त प्रतिसाद

 

अमरावती, दि. 2 : प्राकृतिक कृषी, मिलेटस् व जिल्हा कृषी महोत्सवात महिला बचत गटांचे अस्सल ग्रामीण पदार्थांचे स्टॉल्स लागले आहेत. येथे भरडधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या पौष्टिक व चविष्ट पदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत. यातील कारळे, मोहलाडू, जवस लाडू, उन्हाळी कुरड्या, पापड, लोणची, यासह कुटकी, कोदो, राजगिरा, ज्वारी, हरी कंगणी, सावा, राळा, नाचणी, बाजरी या ग्लूटेन फ्री पदार्थांपासून बनलेली बिस्कीटे, पास्ता, मॅगी, चकल्या, कडधान्यापासून तयार खाद्यपदार्थांना नागरिकांची पहिल्याच दिवशी पसंती मिळाली. ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये तयार होणारे खाद्यपदार्थ येथे विनायास उपलब्ध होत असल्यामुळे या पदार्थांची महिला वर्गांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. येथे विविध स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे.

कृषी महोत्सवामध्ये सेंद्रिय पध्दतीची धान्ये, शेतमाल यामध्ये सेंद्रीय ताजी फळे व भाजीपालाही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सेंद्रीय धान्याला नागरिकांकडून चांगली मागणी होत आहे. भरडधान्य महोत्सवांतर्गत विविध प्रकारची भरडधान्ये येथे उपलब्ध आहेत. यामध्ये धारणी व मेळघाट भागातील कुटकी, कोदो या पौष्टिक भरडधान्यापासून तयार पीठे, भाजणी पीठे यांची रेलचेल आहे. तसेच पचनास हलके व चविष्ट ज्वारीच्या लाह्या ग्राहकांना आकर्षित करीत आहे.

स्वयंसहाय्यता महिला बचत गटांमार्फत गृहोपयोगी वस्तू, कापडी पिशव्या, बांबूपासून तयार केलेल्या सजावटीच्या आकर्षक वस्तू, शोभेच्या भेट वस्तू, प्राकृतिक घटकांपासून तयार केलेले हवन साहित्य, धूप, अगरबत्ती, गोवरी, शिवभस्म, दिवा वाती आदी हस्तनिर्मित वस्तू येथे उपलब्ध आहेत. बांबू व लाकडापासून तयार केलेल्या सूप, टोपली, डोली, पारडे यांचेही स्टॉल आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुर्जी येथील गाठी गृह उद्योगातील गाठीलाही मागणी होत आहे. सेंद्रीय हळद, तिखट, गुळ, धने पावडर, विविध प्रकारच्या चटण्या, आवळा सुपारी, आवळा मुरब्बा असे विविध पदार्थ उपलब्ध आहेत.

‘थेट उत्पादक ते थेट ग्राहक’ या अंतर्गत कैरी, द्राक्षे, पपया, कलींगड या फळांचेही स्टॉल्स लागले आहेत. स्वयंसहायता महिला बचत गटांमार्फत येथे खानावळ स्टॉल्स लावण्यात आले आहे. यामध्ये झुनका भाकरी, मांडे, वांग्याचे भरीत या शाकाहारी पदार्थांसह मटन-मांडे, चिकन मांडे, अंडाकरी या पदार्थांचे स्टॉल्स लागले आहेत.

 

शेतकऱ्याची प्रतिक्रिया

मी शेतकरी असून आज कृषी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी येथे आलो. येथे भरडधान्यांबद्दल खूप चांगली माहिती मिळाली. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांवर आहाराच्या माध्यमातून नियंत्रण मिळविता येते. यासाठी आपण पूर्वी वापरत असलेल्या बाजरी, ज्वारी अशा भरडधान्यांना आता चांगले दिवस येत आहे. शेतकऱ्यांनी भरडधान्यांचा पेरा वाढवावा. ‘कुटकी’ या भरडधान्यांबद्दल प्रथमच माहिती मिळाली. ती अत्यंत पौष्टिक असल्यामुळे त्याची खरेदी केली.

- पुरुषोत्तम निमाडे, मु.पो. खोडगाव, ता. अंजनगाव सुर्जी

 

 

गृहिणीची प्रतिक्रिया

            कृषी महोत्सवाच्या निमित्ताने येथील प्रत्येकच दालनामध्ये वेगवेगळ्या वस्तू, खाद्यान्ने पहायला ‍मिळत आहे. ग्रामीण भागात तयार होणारी मुगवडी बाजारपेठेपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध आहे. पौष्टिक हातसडीचे तांदूळ मिळाले. येथे सेंद्रीय पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने या कृषी महोत्सवात काही ना काही खरेदी करुन बचत गटाच्या महिला आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावे.

- करुणा कदम, अमरावती

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...