प्रशासनाकडून ऑनलाईन सेवांचा विस्तार प्रमाणपत्रांसाठीच्या 12 हजार अर्जांवर तत्काळ प्रक्रिया



अमरावती, दि. 13 : नागरिकांना आवश्यक कागदपत्रे तत्काळ मिळवून देण्यासाठी  प्रशासनाने विविध प्रमाणपत्रांच्या ऑनलाईन सेवांचा विस्तार केला असून, त्यामुळे नागरिकांना अनेक प्रमाणपत्रे ऑनलाईन मिळवणे शक्य झाले आहे. या उपक्रमांना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, दि. 1 जूनपासूनची आकडेवारी पाहता 12 दिवसांत (12 जूनपर्यंत) सुमारे 12 हजार अर्जांवर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 
ऑनलाईन सेवांसाठी सुलभ असे आपले सरकार वेबपोर्टल, तसेच आरटीएस महाराष्ट्र हे मोबाईल ॲप शासनाकडून सुरु करण्यात आले. ही प्रक्रिया जिल्ह्यातील कार्यालयांनी अधिकाधिक सेवांसाठी वापरण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व उपविभागीय कार्यालये व तहसील कार्यालयांना दिले. त्यानुसार प्रशासनाकडून विविध कार्यालयांत सेवांचा विस्तार करण्यात आला आहे.
वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, भूमीहीन प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्रासह नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र व नुतनीकरण, रहिवास दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदी विविध प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. सेतू, तसेच जन सेवा केंद्राद्वारे विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रे दाखल केल्यानंतर प्रमाणपत्रे दिली जातात. तथापि, ही प्रक्रिया गतिमान व्हावी या उद्देशाने आता प्रशासनाने ऑनलाईन सेवांचा विस्तार केला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी दिली.  
   जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑफलाईन प्रक्रिया असताना पूर्वी नागरिकांचा वेळ जात होता. मात्र, आता ऑनलाईन झाल्याने नागरिकांना घरबसल्या प्रमाणपत्र मिळविण्याची सोय झाली आहे.  त्यामुळे नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत, असे अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी सांगितले. 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती