Tuesday, June 25, 2019

जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आजारी उद्योगांच्या पुनर्वसनासाठी सर्वंकष प्रयत्न करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल





अमरावती, दि. 25 : औद्योगिक वसाहतीतीतल आजारी व बंद उद्योगांच्या पुनवर्सनासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय बांगर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राहूल बनसोड, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक एल. के. झा यांच्यासह मनपा प्रशासन व विद्युत विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, लघुउद्योगांच्या विकासासाठी शासनाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येतात. आजारी व बंद स्थितीत असलेल्या उद्योगांबाबत आवश्यक उपाययोजना वेळोवेळी राबविल्या पाहिजेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेने अशा उद्योगांची  सद्य:स्थिती तपासावी व आवश्यक उपाययोजना कराव्यात. एनपीए युनिट म्हणून आढळलेल्या उद्योगांबाबत योग्य कार्यवाही तत्काळ करावी.
          ते पुढे म्हणाले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व उद्योगात पर्यवेक्षीय श्रेणीत किमान पन्नास टक्के, अपर्यवेक्षीय श्रेणीत ऐंशी टक्के व पर्यवेक्षीय सहित इतर श्रेणीत किमान ऐंशी टक्के स्थानिक लोकांना रोजगार देणे आवश्यक आहे. त्यानुसार एमआयडीसी प्रशासनाने सद्य:स्थिती तपासून कार्यवाही करावी व स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा.
          एमआयडीसीमध्ये लघु उद्योग स्थापित करण्यासाठी महिला उद्योजकांसाठी भूखंड राखीव ठेवण्यात यावे. उद्योग विभागाच्या पॅकेज स्कीम प्रोत्साहन योजनेचा जिल्ह्यातील गरजू उद्योजकांना लाभ देण्यात यावा, असेही निर्देश श्री. नवाल यांनी म्हणाले.
          एमआयडीसीच्या क्षेत्रात कुठल्याही दुर्घटनेवर तातडीने नियंत्रण करण्यासाठी त्याठिकाणी अग्निशमण यंत्रणा, रस्ते निर्मिती, रुग्णालय व पोलीस चौकी आदी सुविधा तातडीने उभारण्यात याव्यात. जिल्ह्यातील नव्याने स्थापित वस्त्रोद्योग कारखान्यात जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेत त्यासंबंधीचा ट्रेड प्रशिक्षणाची सुरुवात करुन कुशल प्रशिक्षणार्थी उपलब्ध करावेत, असेही श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.
                   एमआयडीसी रस्त्यालगतची अतिक्रमणावर कारवाई होणे गरजेचे आहे, तसेच औद्योगिक वसाहतीत स्वच्छता राखण्यासाठी पुरेसे कंटेनर आदी व्यवस्था करण्याची सूचना श्री. पातुरकर यांनी केली. याबाबत तत्काळ कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिका-यांनी पालिका प्रशासनाला दिले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...