Tuesday, June 25, 2019

कृषी मंत्री यांचा जिल्ह्यात पहिला कार्यक्रम उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नरत - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे







अमरावती, दि. 23 : शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे, असे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले.
             कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात तालुकास्तरीय शेतकरी व कृषी मित्र प्रशिक्षण कार्यक्रम वरुड तालुक्यातील मुसळखेडा येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचा जिल्ह्यातील हा पहिलाच कार्यक्रम होता. संत योगीराज महाराज, वरुडच्या नगराध्यक्षा स्वाती आंडे,  श्रीमती वसुधाताई बोंडे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी आदी उपस्थित होते.
           ज्या मातीने मला पहिल्यांदा आमदार केले, तिचे पहिल्यांदा दर्शन घेणार हे ठरवले होते. त्यामुळे इथे पहिला कार्यक्रम घेतला, असे सांगून डॉ. बोंडे म्हणाले की, कृषी मंत्री पदाच्या रूपाने मोठी जबाबदारी मिळाली आहे. सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या परिस्थितीतून जात आहे. राज्यात चांगले पर्जन्यमान होण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना आपण सर्व मिळून करूया, असे आवाहन डॉ. बोंडे यांनी प्रारंभी केले. 
          ते म्हणाले की, मान्सून लक्षात घेता कृषी खात्याने संपूर्ण ताकदीने काम करावे. रिक्त पदे भरण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक आहेत.   विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करावे. कृषी सहायक हा योजनेच्या अंमलबजावणी यंत्रणेचा महत्वाचा घटक असल्याने कृषी सहायकाला ग्रामपंचायत इमारतीत बसण्यासाठी जागा देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे पीक विम्याच्या तक्रारींचे वेळीच निराकरण करण्यासाठी विमा कंपनीचा प्रतिनिधी कृषी कार्यालयात उपलब्ध असला पाहिजे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया गतिमान व अद्ययावत माहिती ठेवली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.
  
वाळलेल्या झाडांचे पंचनामे करा

जिल्ह्यात 68 हजार हेक्टर पैकी 14 हेक्टर संत्रा झाडे वाळली आहेत. त्यांचे तातडीने प्राथमिक सर्वेक्षण व पंचनामे करून घ्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
शेतकरी व वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी पद आहे. त्यामुळे सत्कार नकोत. आपण सगळ्यांनी मिळून सत्कार्य करूया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताचे निर्माण होत आहे. या विकासप्रक्रियेत सहभागी होऊन आपणही योगदान देऊया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
प्रारंभी डॉ. बोंडे यांनी श्री हनुमान मंदीर व संत यशवंत महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेतले. यावेळी संस्कार भारती तर्फे मंत्री महोदयांची ग्रंथतुला करण्यात आली. कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. वरुड- मोर्शी शहरात व विविध गावात ठिकठिकाणी विविध संस्था व नागरिक यांच्याकडून मंत्री महोदयांचे स्वागत करण्यात आले.
कार्यशाळेत कृषी तज्ज्ञ श्याम ताथो डे यांनी मार्गदर्शन केले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...