Wednesday, June 26, 2019

सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्यायभवनात कार्यक्रम
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या क्रांतिकारी कार्याने परिवर्तनाला गती
-वित्त सहसंचालक उत्तमराव सोनकांबळे

अमरावती, दि. 26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे देशातील परिवर्तनाच्या चळवळीला गती मिळाली, असे प्रतिपादन वित्त व कोषागार सहसंचालक उत्तमराव सोनकांबळे यांनी आज येथे केले.
राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अर्थात सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे, वित्त व लेखा सहसंचालक डॉ. प्रकाश दासे, समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. दिलीप काळे, सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून, प्रा. प्रवीण खांडवे आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. सोनकांबळे म्हणाले की, महापुरुषांचे कार्य पाठ्यपुस्तकातून नव्हे, तर समाजाच्या विद्यापीठातून चांगले कळते. शाहू, फुले, आंबेडकरांनी मोठ्या सामाजिक सुधारणांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वाचे कार्य केले. राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी आपल्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली. मागास वर्गासाठी आरक्षण व विविध वसतिगृहांची उभारणी केली. त्यांचे निर्णय क्रांतिकारी व परिवर्तन घडवणारे होते.
श्री. सोनकांबळे यांनी यावेळी सिंधु संस्कृतीपासून ते आजचे भारतीय समाजकारण, स्थित्यंतरे यांची अभ्यासपूर्ण मांडणी केली.
श्री. वारे म्हणाले की, द्वेषावर आधारित जातिभेदाची भावना समूळ मिटविण्यासाठी व समतेचे राज्य आणण्यासाठी सर्वांनी फुले- शाहू- आंबेडकर ही विचारधारा आत्मसात केली पाहिजे.
 श्री. खांडवे यांनी यावेळी छतावरील पाण्याचे व्यवस्थापनाबाबत सादरीकरण केले. उत्तमराव भैसने, मुरलीधर पिसे, नारायणराव मेंढे, भाऊसाहेब पेठे, सुरेश स्वर्गे, सखुबाई वाळसे, श्री. खंडारे, श्री. हातागडे आदींना यावेळी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. व्यसनमुक्तीच्या कार्याबद्दल श्रीकृष्ण पखाले यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात आला. 
श्रीमती मून यांनी प्रास्ताविक केले. समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी आभार मानले. श्री. पखाले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी श्यामभाऊ आकोडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, लेखाधिकारी मोहन आगळे, नितीन दांडगे यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
                                                       




No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...