अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या इमारतीचे भूमिपूजन जिल्ह्यात सर्वदूर पायाभूत सुविधांचा विकास - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील






अमरावती, दि. १५ : कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसह रस्तेविकास व पायाभूत सुविधांसाठी जिल्ह्यात सुमारे 25 हजार कोटी रूपये निधीतून अनेक विकासकामे होत आहेत. जिल्ह्यात सर्वदूर व समतोल विकास याद्वारे होत आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.  
          अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या इमारतीचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. आमदार रमेश बुंदिले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, महिला व बालकल्याण सभापती वनिता पाल, आरोग्य सभापती बळवंत वानखेडे, पंचायत समितीच्या सभापती प्रियंकाताई दाळू, उपसभापती महेश खारोडे,  जि. प. सदस्य प्रवीण तायडे, विठ्ठल चव्हाण, जयंत आमले, गटविकास अधिकारी धोत्रे, दाळू महाराज आदी उपस्थित होते. 
          पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, गत पावणेपाच वर्षात जिल्ह्यात सर्वच भागात विविध विकासकामांना चालना देण्यात आली. पालकमंत्री पांदणरस्ते योजनेसारखी योजना ग्रामविकासात महत्वपूर्ण ठरली आहे. जलपुनर्भरणासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्ड्याच्या योजनेला चालना दिली आहे. यापुढे जलयुक्त शिवार व सिंचन विकासावर भर देऊन कामे करणार आहे. पंचायत समितीची ही इमारत विहित मुदतीत पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.  
          पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे रस्तेविकासाची व पायाभूत सुविधांची मोठी कामे जिल्ह्यात झाली, असे श्री. बुंदिले म्हणाले.  श्री. पोटे पाटील यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली पालकमंत्री पांदण रस्ते योजना राज्यभर अंमलात आली. या योजनेत नियम व अटींचे थोड्या प्रमाणात सुलभीकरण होण्याची गरज श्री. वानखेडे यांनी व्यक्त केली. श्री. लाडोळे, श्री. ढोमणे, श्री. खारोडे, नितीन पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती