Tuesday, June 18, 2019

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकही पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि.  18 :   आयुष्यमान भारत कार्यक्रमाद्वारे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविण्यात येत असून, एकही पात्र नागरिक त्यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
योजनेबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 श्री. नवाल म्हणाले की, लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत सर्जिकल आणि मेडिकल उपचार मान्यताप्राप्त खासगी आणि शासकीय रुग्णालयामार्फत उपलब्ध होणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व विविध घटकांच्या सहभागासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीचे पत्र आशासेविका, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत पाठविण्यात आली आहेत. लाभार्थी कुटुंबांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थींना स्वतःची ई-कार्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सेतू केंद्र किंवा आरोग्य मित्रांना भेटून कार्ड तयार करून घेण्याबाबत संबंधित नागरिकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
          शिधापत्रिका तसेच प्रधानमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे पत्र आणि स्वतःचे ओळखपत्र, आधार कार्ड दाखवून हे ई- कार्ड प्राप्त करता येते. या कार्डाच्या आधारे आरोग्य विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे.  या योजनेत सामाजिक आर्थिक जातीय जनगणनेतील (एसईसीसी डेटा) राज्यातील 83 लक्ष 72 हजार कुटुंबांचा समावेश असून यामध्ये शहरी भागातील 24 लाख 81 हजार व ग्रामीण भागातील 58 लक्ष 99 हजार कुटुंबे समाविष्ट आहेत, अशी माहिती डॉ. निकम यांनी दिली.
          ते म्हणाले की, योजनेत जिल्ह्यात एकूण 3 लाख 73 हजार 266 कुटुंबांचा समावेश असून, त्यात 2 लाख 83 हजार 229 ग्रामीण व 90 हजार 37 शहरी कुटुंबे आहेत. एकूण 4 हजार 62 कार्डवाटप झाले आहे. ही गती वाढविण्यासाठी जागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

ग्रामीण भागातील घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावती व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमीहीन  शेतकरी आदी  वर्गांतील कुटुंबाचा तर शहरी भागातील कचरावेचक, भिकारी, घरकामगार, फेरीवाले, बांधकाम मजूर, कारागीर आदी वर्गातील कुटुंबांचा समावेश प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत आहे. या योजनेबाबत माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1800 111 565 तसेच 14 555 आहे.
                                                 
                                      महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत लाभार्थी कुटुंबीयांना प्रति वर्ष प्रति कुटुंब रुपये दीड  लक्ष रुपयांचा लाभ रुग्णालयातून घेण्यात येतो. या योजनेत 971 सर्जिकल व मेडिकल आजारांवर उपचार घेता येतो. आतापर्यंत सदर योजनेत 48 हजार आठ रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. योजनेबाबत टोल फ्री क्रमांक 1800 233 2200 तसेच 155 388 असा आहे.
                                      000  

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...