Wednesday, June 12, 2019

जलयुक्त शिवार अभियानात नदी नांगरण्याचा प्रयोग पाण्याची उपलब्धता वाढेल - जिल्हाधिकारी शैलेश नवाल








अमरावती, दि. 12 : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात नदी नांगरण्याचे प्रयोग होत असून, त्याद्वारे नदीचे पाणी वाहून न जाता भूमीत मुरेल व जलस्तर उंचावून परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज व्यक्त केला.
            जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी अचलपूर तालुक्यातील गावांचा दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार निर्भय जैन यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
            अचलपूर तालुक्यातील जलालपूर, देवगाव परिसरातील चंद्रभागा नदीत जेसीबी आदी यंत्राद्वारे नदी नांगरण्याचा प्रयोग होत आहे. नदीच्या पात्राची जमीन सखोल नांगरली जात आहे.  नदीच्या दोन्ही काठांदरम्यानचा भाग संपूर्ण सखोल नांगरल्यामुळे पुराचे पाणी वाहून न जाता भूमीत मुरेल. त्यामुळे जलस्तर उंचावून पाणीटंचाईपासून दिलासा मिळेल.नदीलगतच्या विविध गावांना, शेतशिवाराला त्याचा फायदा होईल व कृषी उत्पादकताही वाढेल, असे श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यात इतरही ठिकाणी जिथे पुराच्या शक्यता आहेत किंवा पाणी वाहून जाण्याचे मोठे प्रमाण आहे, तिथे अशी कामे विनाविलंब चालू करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अनेक ठिकाणी गाळ साचून नदीचे पात्र उथळ होते. पुराचे प्रमाण वाढते. अशाठिकाणी ही कामे तत्काळ करावीत. या उपक्रमामुळे परिसरातील पाण्याचे स्त्रोत वाढण्यास मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.
            राजुरा शिवार, नारायणपूर परिसरात जलयुक्त शिवार अभियानातील सिमेंट नाला बांधाच्या कामांची पाहणी श्री. नवाल यांनी केली. या बंधा-यामुळे 139 हेक्टर जमीनीला लाभ मिळणार आहे. यावेळी श्री. नवाल यांनी गावक-यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. परिसरातील काही गावे पोकरामध्ये समाविष्ट आहेत. तेथील कामांचीही माहिती त्यांनी घेतली. बोरगावपेठ या गावाला भेट देऊन त्यांनी खरीप कर्ज वितरण, विविध योजनांची अंमलबजावणी याबाबत माहिती घेतली व तेथील गावक-यांशी संवाद साधला. 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...