उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजना अपंगत्वावर मात करून शेतमजुराने उभारला डाळ मिलचा व्यवसाय

      








अमरावती, दि. 11 : शेतमजूर असलेल्या गणेश मानकर या युवकाने अपंगत्वावर मात करून भातकुली येथे डाळ मिलचा यशस्वी व्यवसाय उभारला आहे.  
गणेश मानकर हे मूळ सायतचे रहिवाशी असून, त्यांच्या कुटुंबात आई- वडलांसह 2 भाऊ आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. बालपणीच पोलिओमुळे त्यांना अपंगत्व आले. गणेश यांच्या घरी केवळ पाच एकर जमीन आहे. त्यामुळे घरची परिस्थिती साधारणच होती. दहावीनंतर गणेश हे शेतमजुरी करू लागले. पुढे काही वर्षांनंतर लग्न झाले. कौटुंबिक जबाबदा-या वाढल्या. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काहीतरी व्यवसाय करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांच्या पत्नी दिपीका यांनीही आपल्या पतीला पूर्ण पाठबळ दिले. 
परिसरात तूर, हरबरा, उडीद, मूग आदी कडधान्याचे मोठे उत्पादन होते. त्यामुळे गणेश यांनी भातकुली येथे डाळ मिल उभारण्याचा संकल्प केला. डाळ मिलसाठी आवश्यक यंत्रणेची माहितीही त्यांनी जाणून घेतली. डाळ मिलसाठी आवश्यक यंत्रणा सुमारे पावणेचार लाख रूपयांची होती. गणेश यांची आर्थिक स्थिती जेमतेम व हातावर पोट असल्याने फारशी बचत नव्हती. जी काही बचत होती, त्यात काही नातेवाईक व मित्रांनी मदतीची भर घातली.  दरम्यान,  गणेश यांना शासनाच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेअंतर्गत कृषी सहायकांकडून माहिती मिळाली.  या योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी कृषी कार्यालयाकडे अर्ज केला.
गणेश यांची व्यवसायाची तयारी, जिद्द पाहून कृषी कार्यालयाकडून त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. डाळ मिल खरेदीपोटी त्यांना चाळीस टक्के अनुदान मिळाले. शासनाकडून 1 लाख 40 हजार रूपयांचे अनुदान मिळाल्याने गणेश यांची रसिका डाळ मिल भातकुली येथे उभी राहिली. विविध कडधान्याची डाळ बनविण्याचे काम त्यांनी सुरु केले.
धान्यापासून डाळ बनविण्यासाठी विविध प्रक्रिया कराव्या लागतात. धान्य स्वच्छ करणे, धुणे, वाळवणे, दोन-तीन वेळा यंत्रातून काढणे या सगळ्या कामांत गणेश यांच्यासह त्यांची पत्नी दिपीकाही राबू लागल्या. पुढे धान्यापासून डाळ करून देण्याचे काम वाढत गेले.  गणेश यांना शेतमजुरी करण्याची गरज उरली नाही व डाळ मिलचे काम वाढल्यामुळे त्यांनी काही व्यक्तींनाही आपल्या उद्योगात रोजगार मिळवून दिला.   
फेब्रुवारी ते एप्रिल हा साधारणत: डाळनिर्मितीचा हंगाम असतो. प्रतिदिन सात क्विंटल डाळ निर्मिती त्यांच्या उद्योगातून होऊ लागली आहे. पहिल्या वर्षी त्यांना सव्वा लाख रूपयांहून अधिक निव्वळ उत्पन्न मिळाले. डाळ मिलसह हरभरा डाळ स्वच्छ करण्यासाठी शेलर, ग्रेडर मशिन, पॉलिशर, गहू साफ करण्याचे ग्रेडर मशिनही त्यांनी आणले आहे.  दुस-या वर्षी त्यांच्या उत्पन्नात चांगली भर पडली आहे. आता गणेश यांनी शेवया बनविण्याची मशिन आणली आहे. रव्याचा पापडा बनविण्याची मशिनही ते लवकरच घेणार आहेत.
कृषीमंडळ अधिकारी प्रमोद खर्चान, कृषी सहायक अनिल खलारे यांनी गणेश यांना या प्रकल्पासाठी गणेश यांना माहिती दिली.  जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल इंगळे, अनिल खर्चान यांनी मार्गदर्शन केले. जिद्द,  चिकाटी व कष्ट याद्वारे अपंगत्वावरही मात करता करून यशस्वी व्यवसाय उभारता येतो, हे गणेश यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती