प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान जिल्ह्यात सव्वासहा हजार तरूणांनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ



अमरावती, दि. 14 :  प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानातील कौशल्य प्रशिक्षणाचा आतापर्यंत जिल्ह्यातील सव्वासहा हजार युवक- युवतींनी लाभ घेतला असून, त्यातील बहुतांशजण नोकरी किंवा स्वयंरोजगाराद्वारे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाले आहेत.
याबाबत माहिती देताना जिल्हा रोजगार व कौशल्य विकास अधिकारी प्रफुल्ल शेळके म्हणाले की, राज्यातील इच्छूक युवक- युवतींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांत कौशल्य प्रशिक्षण देणे व त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
ते म्हणाले की, योजनेसाठी राष्ट्रीय पातळीवर रोजगाराची अधिक संधी असलेली 11 क्षेत्रे निवडण्यात आली आहेत.  बांधकाम,   उत्पादन व निर्मिती, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल,  आतिथ्य, आरोग्य देखभाल, बँकिंग, वित्त व विमा, संघटित किरकोळ विक्री, औषधोत्पादन व रसायने, माहिती तंत्रज्ञान व संलग्न, कृषी प्रक्रिया ही प्राधान्याची क्षेत्रे आहेत.  इतर अन्य महत्त्वाची क्षेत्रांतही (जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी आदी) उमेदवारांना प्रशिक्षित करून त्यांचे सक्षमीकरण करण्यात येते.    
 15 ते 45 या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही क्षेत्राचे कौशल्य मिळविण्यासाठी प्रशिक्षण मिळते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकडून सूचीबद्ध केलेल्या संस्थांकडे अर्ज करून प्रशिक्षण मिळविता येते. गारमेंट, ब्युटिशियन, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल, आयटी, संगणक, डिजिटल फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, बांधकाम, सिक्युरिटी, इलेक्ट्रॅानिक्स, प्लंबर अशा विविध प्रशिक्षणाचा योजनेत समावेश आहे.  सर्व प्रवर्गातील युवक व युवतींना हे प्रशिक्षण दिले जाते.
ते पुढे म्हणाले की, भविष्यकाळातील कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवले आहे. त्यानुसार  युवकांसाठी नियमितपणे रोजगार- स्वयंरोजगार मेळावेही घेतले जातात. त्याशिवाय,विविध स्पर्धा परीक्षा देणा-या युवकांसाठी स्वतंत्र ग्रंथालय व अभ्यासिकाही कार्यालयात स्थापण्यात आली आहे. करिअरविषयक साहित्य व मार्गदर्शन तिथे उपलब्ध आहे.
            हे प्रशिक्षण आपल्यासाठी लाभदायी ठरल्याचे इलेक्ट्रिकल वाईंडरचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मोहम्मद नासिर मोहम्मद खलिल याने सांगितले. तो म्हणाला की, मला या प्रशिक्षणामुळे इलेक्ट्रिक फिटिंग, वाईंडिग, विविध उपकरणांची दुरुस्ती ही सगळी कामे करता येतात. ट्रेनिंगमुळे मला स्वयंरोजगार प्राप्त झाला व मी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ शकलो. 
                                                000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती