कोरोना उपचार प्रोटोकॉल व म्युकरमायकोसिस आजारासंबंधी डॉक्टरांची कार्यशाळा

म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी कोविडबाधितांवर उपचार करताना खबरदारी आवश्यक

कार्यशाळेत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 

अमरावती, दि. 22 :  जिल्ह्यात दीडशेवर म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात कोरोना उपचारानंतर बरे झालेल्या मधुमेही रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. स्टेरॉईड व औषधांच्या अतिवापराने रक्तशर्करा वाढून बुरशीजन्य आजार उद्भवत असल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. या पार्श्वभूमीवर इंजेक्शन व औषधांचा अतिमारा टाळणे व रुग्णाची मेडिकल हिस्ट्री लक्षात घेऊन त्यानुसार उपचार होण्याची गरज आहे. तशी खबरदारी सर्व डॉक्टर व रुग्णालयांनी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी आज येथे व्यक्त केले.  

जिल्हा प्रशासन व अमरावती महापालिकेमार्फत कोरोना उपचार प्रोटोकॉल व म्युकरमायकोसिस आजारासंबंधी डॉक्टरांची कार्यशाळा बचतभवनात झाली. आरोग्य तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. अजय डफळे, डॉ. ए. टी. देशमुख, डॉ. विजय बख्तार, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. क्षितीज पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. विशाल काळे आदी उपस्थित होते.

                        वेळीच खबरदारी आवश्यक : डॉ. कडू

डॉ. कडू म्हणाले की, कोविडबाधितांवर हायर अँटिबायोटिक्स, स्टेरॉईडचा अतिवापर टाळणे आवश्यक आहे. उपचारादरम्यान मधुमेह नियंत्रित असला पाहिजे. एखाद्याला नाक कोरडे होणे, नाकाच्या बाजूला भाग लाल होणे, दुखणे, नाकातून लाल किंवा काळसर रंगाचा द्रव्य बाहेर येणे, डोळा लाल होणे, डोके भयंकर दुखणे, उलट्या होणे, पॅरालिसिस, एकच वस्तू दोन असल्याचे दिसणे अशी लक्षणे असतात. अशी लक्षणे असतील तर तत्काळ उपचार घेतले पाहिजेत. लवकरात लवकर हा आजार ओळखणे व उपचार घेणे हे म्युकरमायकोसिस रोखण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे.

                        मधुमेही रुग्णांमध्ये शर्करानियंत्रण आवश्यक : डॉ. डफळे

डॉ. डफळे म्हणाले की, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारात स्टेरॉईड वापरू नये. रुग्ण दाखल असताना व डिस्चार्जनंतरही रक्तशर्करा नियंत्रित असणे गरजेचे आहे. आवश्यक तिथे इन्शुलिनचा वापर व्हावा. मास्क बदलत राहावा. तो स्वच्छ व कोरडा असावा. नजिकचा पावसाळा लक्षात घेता हे कटाक्षाने पाळावे. म्युकरमायकोसिस फंगल इन्फेक्शनमुळे होतो. काही रुग्णांना बॅक्टेरियल इन्फेक्शनही होत आहे. मास्क घामाने ओला होतो. आर्द्रतेमुळे फंगस वाढू शकतो. मधुमेही बाधितांनी ही काळजी घ्यावी. कोविडमधून वाचला आणि म्युकरमायकोसिसमध्ये अवयव गमावून बसला अशी अवस्था होऊ नये म्हणून वैयक्तिक स्वच्छता व स्वच्छ-कोरडा मास्कचा वापर आवश्यक असल्याचे डॉ. डफळे यांनी सांगितले.

                        लक्षण आढळल्यास नेझल इंडोस्कोपी करावी : डॉ. पाटील

            कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. पाटील म्हणाले की, कोविड किंवा सारी होऊन बरे झालेल्या रुग्णांमध्ये  मधुमेह नियंत्रणात नसेल तर म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव आढळत आहे. मात्र, सगळ्या बरे झालेल्या बाधितांनी घाबरण्याचे कारण नाही. हाय रिस्क रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर दीड ते दोन महिने रक्तशर्करा नियंत्रित ठेवली पाहिजे. अशा रुग्णांनी रोज रक्तशर्करा तपासणे आवश्यक आहे. रक्तशर्करा 180 ते 200 च्यावर असेल तर दुर्लक्ष करू नये. लगेच डॉक्टरांकडे जावे. जर कुठलीही लक्षणे आढळली तर त्वरित ईएनटी तज्ज्ञांकडे जावे. अशावेळी नेझल इंडोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे नाकाचा तपास केला तर सुरुवातीच्या काळातील लक्षणांद्वारे निदान केले जाऊ शकते. जेवढ्या लवकर निदान तेवढा प्रतिबंध शक्य होतो. हा आजार वाढला तर हिरड्या, जबडा, सायनस असा वाढत जाऊन मेंदूकडे जाऊ शकतो. जो भाग निष्क्रिय होतो, तो काढावा लागतो. अचूक निदानासाठी एमआयआर विथ काँट्रास्ट करणे आवश्यक आहे.

                        मध्य भारतात प्रादुर्भाव अधिक : डॉ. बख्तार

कोरोनाच्या नवा स्ट्रेनच्या लाटेत म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव आढळत आहे. विशेषत: मध्य भारतात हा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे सहव्याधी असणा-या सर्व रुग्णांबाबत खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. बख्तार यांनी व्यक्त केले.

                        डिस्चार्जकार्डवर दक्षता सूचनांचा उल्लेख करा : डॉ. निकम

डॉ. निकम म्हणाले की, कोरोनावर उपचार घेणा-या रुग्णांना घरी परतण्यापूर्वी म्युकरमायकोसिसबाबत व घ्यावयाच्या दक्षतेबाबत पूर्ण कल्पना देणे आवश्यक आहे. डिस्चार्जकार्डवर तसा उल्लेख असावा व रुग्णाच्या नातेवाईकांनाही माहिती द्यावी.  

म्युकरमायकोसिसबाबत जिल्ह्यात सर्वदूर जाणीवजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यक क्षेत्रासह सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले. बाधितांवर हिस्ट्री लक्षात घेऊन उपचार व उपचारापश्चात दक्षता पाठपुरावा आवश्यक आहे. ग्रामीण भागात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत जाणीवजागृती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यशाळेला डॉ. अतुल यादगिरे, डॉ. पवन टेकाडे, डॉ. नितीन राठी, डॉ. अनिल रोहणकर, डॉ. अनिल पाटील, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. संदेश चौधरी, डॉ. प्रवीण राठी, डॉ. अतुल यादव, डॉ. दामोदर, मुझम्मिल खान, डॉ. कासिफ, संकेत इंगळे, तेजस धामणकर, डॉ. माधुरी बारब्दे, डॉ. सविता पारथ, करण पारिक, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. फिरोज खान, डॉ. विक्रांत राजुरकर, डॉ. रोहित चोरडिया, डॉ. पंकज चौधरी, डॉ. निखिल खडसे, सॅम मॅथ्यू, डॉ. अंकुश नवले, डॉ. स्मिता त्रिवाण, डॉ. श्रीवास्तव, डॉ. अभिषेक भांगे आदी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती