Thursday, May 6, 2021




गावागावांत कोरोना रोखण्यासाठी काटेकोर दक्षता व नियमपालन आवश्यक

ग्रामस्तरीय समित्यांनी ताकदीनिशी काम करावे

जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

अमरावती, दि. 6 : जिल्ह्यात शहरी भागात संक्रमण कमी होऊन ग्रामीण भागात वाढू लागले आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी ग्रामस्तरीय समित्यांनी ताकदीनिशी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केले.

जिल्ह्यातील विविध तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समित्यांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. नवाल हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नियमितपणे घेत आहेत. आज अचलपूर तालुक्याच्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, तहसीलदार मदन जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत गतवर्षी ग्रामस्तरीय समित्यांनी मोलाची भूमिका बजावून जनजागृती केली, तपासणी मोहिमा आणि अनेक सर्वेक्षणे पार पाडली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव बराच कमी झाला होता. मात्र, आता ग्रामीण भागातही पुन्हा साथीने डोके वर काढले आहे. अशावेळी काटेकोर नियमपालनासाठी ग्रामस्तरीय समितीची भूमिका महत्वपूर्ण आहे. अद्यापही अनेकजण लक्षणे असूनही तपासणी करत नाहीत किंवा गृह विलगीकरणातील व्यक्ती नियम पाळत नाही, अशा तक्रारी येत आहेत. हे थांबविण्यासाठी ग्रामस्तरीय समित्यांनी सर्वंकष प्रयत्न करावे.

श्री. नवाल पुढे म्हणाले की, ग्रामस्तरावर सरपंच, ग्रा. पं. सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल, वैद्यकीय अधिकारी, आशाताई, अंगणवाडी सेविका या सगळ्यांनी समन्वयाने काम करून साथ नियंत्रणासाठी योगदान द्यावे. एखादी बेजबाबदार व्यक्ती ऐकत नसेल व स्वत:सह इतरांचेही आरोग्य धोक्यात आणत असेल तर वेळीच पोलीसांना माहिती द्यावी. ग्रामस्तरीय समित्यांना संपूर्ण सहकार्य करण्याबाबत ग्रामीण पोलीस यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...