कोरोना हारतीवा मेळघाट जिटउवा

मेळघाटात जनजागृतीसाठी कोरकू भाषेतून व्हिडीओपटांची मालिका

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम

-          प्रकल्प अधिकारी मिताली सेठी

 

अमरावती, दि. 3 : कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता आणि स्वयंशिस्त अत्यंत महत्वाची आहे. हे लक्षात घेऊन मेळघाटात व्यापक लोकशिक्षण व जनजागृतीसाठी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘कोरोना हारतीवा मेळघाट जिटउवा’(कोरोना हरेल, मेळघाट जिंकेल) ही व्हिडीओपटांची मालिकाच सुरू करण्यात आली असून, विविध माध्यमांतून ती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिली.

आवश्यक दक्षता घेऊन कोरोनापासून दूर राहता येते. योग्य उपचारांनी कोरोना बरा होतो. साथीचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासकीय प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही तेवढेच महत्वाचे आहे. त्यासाठी दक्षतेचे महत्व नागरिकांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. मेळघाटातील नागरिक बांधवांना त्यांच्या स्वत:च्या भाषेत माहिती देणे आवश्यक होते जेणेकरून कुटुंबातील सर्वजण ही माहिती जाणून घेऊ शकतील. त्यामुळे हा उपक्रम नियमितपणे सुरु करण्यात आला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यापुढेही विविध विषयांवर अशी माहिती प्रसृत करण्यात येणार असल्याचे श्री. सेठी यांनी सांगितले.

घरोघरी आरोग्यशिक्षण

            मालिकेतील व्हिडीओद्वारे साथीचे संक्रमण, आजाराची माहिती, लक्षणे, घ्यावयाची काळजी, आवश्यक उपचार याबाबत डॉ. दयाराम जावरकर हे मेळघाटचे सुपुत्र व एम. बी. बी. एस., एम.डी. तज्ज्ञ अस्सल कोरकू भाषेत प्रेक्षकांशी संवाद साधतात. ममता सोनकर यांनी या मुलाखती घेतल्या आहेत.  यु ट्युब, फेसबुक, व्हाटसॲप आदी सोशल मिडियाद्वारे ही व्हिडीओपटांची मालिका नियमित प्रसारित करण्यात येत असून, त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनाबाबत सर्व शंकांचे निरसन या माहितीतून होते. नागरिकांना आरोग्य शिक्षण देणारे एक नवे माध्यमच याद्वारे उपलब्ध झाले आहे. आरोग्यतज्ज्ञांबरोबरच प्रशासनातील विविध अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आदी व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत व अनेकविध विषयांची माहिती नागरिकांना स्वत:च्या भाषेत घरबसल्या मिळू लागली आहे, असेही श्रीमती सेठी यांनी सांगितले.

 

 

सुलभ संवाद

अनेक प्रकारची महत्वाची माहिती स्थानिक नागरिकांना बरेचदा मराठी व हिंदी माध्यमातून मिळते. मात्र, भाषेमुळे तांत्रिक किंवा महत्वाची माहिती स्थानिक बांधवांना जाणून घेणे कठीण जाते. हे लक्षात घेऊन हा उपक्रम कोरकू भाषेत सुरु करण्यात आला आहे. यात माहिती देणारी डॉक्टरमंडळी ही स्थानिकच असल्याने अत्यंत सुलभ भाषेत ते व्हिडीओद्वारे नागरिकांशी संवाद साधतात.

            मेळघाटसारख्या दुर्गम भागात दृकश्राव्य माध्यम परिणामकारक ठरते. हे लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाबाबत स्थानिकांकडून अत्यंत स्वागतार्ह प्रतिक्रिया मिळत आहेत. कोरकू भाषेतून यापूर्वीही विविध संदेश प्रसारित केले आहेत. त्याचबरोबरच, आरोग्य शिक्षण देणारी ही मालिका नियमितपणे प्रसारित करण्यात येईल, असेही श्रीमती सेठी यांनी सांगितले.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती