नोंदणी झालेल्यांनीच केंद्रावर हजर रहावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



 

नोंदणी झालेल्यांनीच केंद्रावर हजर रहावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल    

लसीकरण नियोजनपूर्वक करा

गर्दी टाळण्याचे आवाहन

नोंदणी झालेल्यांनीच केंद्रावर हजर रहावे

अमरावती, दि. 11 : जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिळून 28 हजार 970 कोविड प्रतिबंधक लस काल (दि. 10 मे) प्राप्त झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन नोंदणी केलेल्या तरूणांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण व पूर्वी लस घेतलेल्या ज्येष्ठांना दुसरी मात्रा असे नियोजनपूर्वक लसीकरण स्वतंत्र केंद्रांवर करण्यात येत आहे. मात्र, लस मिळावी म्हणून नोंदणी न झालेल्यांनी उगाच लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो. लस ही सर्वांनाच टप्प्या टप्प्याने दिली जाणार आहे. तोपर्यंत मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझेशन या कोरोना त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. .

जिल्ह्यातील लसीकरण, तसेच शासकीय व खासगी रुग्णालयातील स्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.  

श्री. नवाल म्हणाले की, लस ही सर्वांनाच दिल्या जाणार आहे. सध्या केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कोविन संकेतस्थळावर नोंदणी झालेल्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे नोंदणी न झालेल्यांनी विनाकारण केंद्रांवर गर्दी करु नये. यामुळे संक्रमणचा धोका वाढू शकतो. लसीकरण केंद्रावर सुध्दा कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोर पालन व्हावे. प्रत्येक केंद्राला दोनशे डोस देण्यात येतात आणि हे डोस नोंदणी झालेल्यानाच वापरले जातात. याचा सकृतदर्शनी डेटा ठेवला जातो. लसीकरण केंद्रावर टोकण पध्दतीने नंबर लावल्या जाते. टोकण सुरळीत वितरीत होण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी त्याठिकाणी पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले.

45 वर्षावरील वरिष्ठांना कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस

 जिल्ह्यास प्राप्त झालेल्या 19 हजार कोविशिल्ड लस 45 वर्षावरील वरिष्ठांना पहिला व दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. या लसीचा दुसरा डोस पूर्वीच्याच लसीकरण केंद्रावर उपलब्ध असेल. नोंदणीनुसार कोविशिल्डचा डोस घेतलेला असणा-यांनीच लसीकरण केंद्रावर यावे. इतरांनी गर्दी करू नये. हे लसीकरण टोकन पद्धतीने करणार असून, सर्वांनी लसीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी केले.

                        तरूणांच्या लसीकरणासाठी 8 हजार 700 कोविशिल्ड लस

एकूण प्राप्त झालेल्या लसीपैकी 8 हजार 700 कोवि‍शिल्ड डोस प्राप्त झाले असून, ही लस केवळ पहिला डोस घेणा-या तरूणांसाठीच आहे. केवळ वय 18 ते 44 वयोगटातील नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच ती देण्यात येणार आहे. त्यासाठी अमरावती महापालिका, ग्रामीण भागात केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रावर दुसरा डोस घेणा-यांनी  गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

कोव्हॅक्सिन प्राप्त

एकूण प्राप्त झालेल्या लसीपैकी कोव्हॅक्सिनचे 1 हजार 270 डोस प्राप्त झाले असून, ही लस केवळ या लसीचा पहिला डोस घेणा-या तरूणांसाठीच आहे. केवळ वय 18 ते 44 वयोगटातील नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच ती देण्यात येणार आहे. त्यासाठी अमरावती महापालिका, ग्रामीण भागात केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. या केंद्रावर दुसरा डोस घेणा-यांनी  गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

18 ते 44 वयोगटातील तरूणांसाठी 15 लसीकरण केंद्रे

(अमरावतीत तीन, ग्रामीण भागात 12)

अमरावती महापालिका क्षेत्रात 1) सबनीस प्लॉट येथील पालिका रूग्णालय 2) बिच्छू टेकडी येथील पालिका रूग्णालय 3) विलासनगर येथील पालिका रूग्णालय ही तीन लसीकरण केंद्रे आहेत.

ग्रामीण भागात 1) यावली शहिद (ता. अमरावती) येथील रुग्णालय 2) भातकुली ग्रामीण रुग्णालय 3) शिरजगाव बंड (चांदूर बाजार) आरोग्य उपकेंद्र 4) सातरगाव (नांदगाव खंडेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 5) धामणगाव रेल्वे 6) चांदूर रेल्वे 7) दर्यापूर 8) तिवसा 9) मोर्शी 10) अंजनगाव सुर्जी (11 व 12) वरूडमधील दोन लसीकरण केंद्रे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन व अपॉईंटमेंटनंतर लसीकरण केंद्रावर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

                        उपचार सुविधांत वाढ करावी : जिल्हाधिकारी श्री. नवाल

ग्रामीण भागात कोविडबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तालुका व ग्रामीण परिसरातील रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांनीही बेडची विशेषत: ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज येथे दिले.  

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे तालुक्यांच्या ठिकाणी नवी व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. सर्व कोविड केअर सेंटरची क्षमता तपासून आवश्यक तिथे खाटा वाढवाव्यात. खासगी रूग्णालयांनीही याप्रकारे उपचार व्यवस्थेत वाढ करावी. ऑक्सिजन खाटा सर्वठिकाणी उपलब्ध असाव्यात. त्यासाठी आवश्यक सामग्री मिळवून दिली जाईल. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. रॅपिड अँटिजन कीट अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करुन घ्याव्यात. रुग्णालयांचे मनुष्यबळ वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती