‘पॉझिटिव्हीटी रेट
कमी करण्यासाठी सर्वकष प्रयत्न करावे

-        विभागीय आयुक्त पियूष सिंह

 

                अमरावती, दि. 17: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत अमरावती जिल्ह्यात संक्रमितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही आता कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बाहेर राज्यातून तसेच जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाश्यांसह, मालवाहतूक गाड्यांची चेक पोस्टवर कोरोना चाचणी अधिक अधिक कठोर करण्यात यावी. ग्रामस्तरावर स्थापित कोरोना प्रतिबंधात्मक समित्यांव्दारे गावागावांत कोरोना तपासणींचा वेग वाढवावा. कोरोना संक्रमणाचा ‘पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्यासाठी सर्वकष प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपायायोजना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधिक्षक (ग्रामीण) हरीबालाजी एन., मनपा आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. सिंह म्हणाले की, जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांचा आकडा गेल्या दोन महिन्यांपासून वाढत आहे. संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभागासह महसूल व पोलीस प्रशासनाने मिशन मोडवर प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अमंलबजावणी करावी. जिल्ह्यात काही गावे अल्प कोरोना बाधित तर काही गावे संपूर्णपणे कोरोना बाधित आढळून आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी जाणीवपूर्वक काम करणे आवश्यक असून वेळीच प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले की, धारणी, परतवाडा तसेच वरुड सिमाभागातून मध्यप्रदेश मधून येणाऱ्या प्रवाश्यांची तसेच मालवाहतूक, ॲम्बूलन्स आदी वाहनांची सिमाभागावरील चेक पोस्टवर कडक तपासणी करावी. आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची तपासणी करुनच संबंधितांना जिल्ह्यात प्रवेश द्यावा. ग्रामीण भागात आरटीपीसीआर सह रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट बंधनकारक करावी. शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी. ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंध समित्यांना सक्रीय करुन त्यांच्याव्दारे लोकांमध्ये जनजागृती करावी. विनाकारण फिरणाऱ्यांवर समित्यांव्दारे कारवाई करावी. यासाठी पोलीस प्रशासनाने स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे.

जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे, संक्रमितांची आकडेवारी, लसीकरणाची आकडेवारी, लसीची उपलब्धता, पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यू दर, प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना उपचार व ऑक्सिजन साठा, ऑक्सिजन बेडची संख्या, जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, कंटेन्टमेंट झोनची सद्यस्थिती, डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल, कोविड केअर सेंटर आदी संदर्भात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांना माहिती दिली.

जिल्ह्यात एकूण 1 हजार 560 गाव आहेत. त्यापैकी 270 गावांत एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. सुमारे 1 हजार 200 गावांत अल्प प्रमाणात पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या तर 750 गावांत पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या गावातील पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्तींचे मृत्यू प्रमाण इतरांपेक्षा अधिक आहे. कुंटूंबातील एक किंवा दोन व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्यावर संपूर्ण कुटुंबच पॉझिटिव्ह झाल्याचे वैद्यकीय तपासणी अंती दिसून आले आहे. ज्या गावांत कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या अधिक दिसून आली आहे, तेथील ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंध समितीत्या सदस्या अधिक प्रभावीपणे काम करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी स्थानिक प्रशासनासह आरोग्य व पोलीस विभागाचेही सहकार्य घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी बैठकीत दिली.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती