पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून जि. प. कोविड सेंटरला दोन कॉन्सन्ट्रेटर भेट

उपचार यंत्रणेला आवश्यक साधनसामग्री मिळवून देऊ

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २५ : कोविड प्रतिबंधासाठी उपचार यंत्रणेचा विस्तार करतानाच जिल्हा परिषदेच्या विश्राम गृह येथे कोविड केअर तथा समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दोन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले. हे केंद्र सुसज्ज होण्यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री मिळवून देऊ, असेही पालकमंत्र्यांनी आज सांगितले.

येथील मालटेकडी परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात उभारण्यात आलेल्या कोविड केअर तथा समुपदेशन केंद्राचे लोकार्पण नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. या केंद्रासाठी पालकमंत्र्यांनी स्वत:कडून दोन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले. आमदार बळवंतराव वानखडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

         ग्रामीण भागात कोविडबाधितांच्या संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपचार यंत्रणेचाही विस्तार करण्यात येत आहे. साथ नियंत्रणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संकल्पना व सहकार्यातून हे कोविड केअर सेंटर सुरु झाले. या केंद्राला आवश्यक ती सर्व साधनसामग्री मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली.

            या कोविड केअर सेंटरला सद्य:स्थितीत 20 खाटांची सुविधा करण्यात आली आहे. त्यापैकी दोन खाटांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात आले आहे. यापुढे आणखी दहा बेडचे नियोजन याठिकाणी करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून अतितातडीच्या वेळी कोरोनाच्या रुग्णांना याचा उपयोग होईल. 

या केंद्रात रुग्णांच्या वैद्यकीय उपचार व देखभालीसाठी एक वैद्यकीय अधिकारी, तीन समुदाय आरोग्य अधिकारी, दोन परिचारिका कार्यरत राहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती