नऊ अद्ययावत रुग्णवाहिका जिल्ह्याच्या सेवेत

पालकमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नरत

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

·         जिल्ह्याला आणखी पाच रुग्णवाहिका मिळणार

 

अमरावती, दि. 24 : कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर सक्षम उपचार यंत्रणेसह आवश्यक त्या सर्व सुविधांची उभारणी करण्यासाठी शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा, आवश्यक साधनसामग्री मिळवून देत आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे, असे प्रतिपादन राज्याचे महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.  

            आरोग्य विभागातर्फे नऊ रूग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

                                    आणखी पाच रुग्णवाहिका येणार

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रूग्णालय, तालुका, ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तम आरोग्य सुविधा निर्माण होत आहेत. विविध रूग्णालयांच्या इमारतींसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव व कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेचा लहान मुलांना धोका लक्षात घेऊन दोन स्वतंत्र वॉर्ड आकारास येत आहेत. त्यासोबतच्या नऊ रूग्णवाहिका जिल्ह्याच्या सेवेत रूजू झाल्या असून, विविध तालुक्यांमध्ये त्या सेवा देतील. गरजूंना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. त्याशिवाय, आणखी पाच रुग्णवाहिका लवकरच जिल्ह्याला मिळणार असून, प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्या वितरीत करण्यात येतील. ग्रामीण भागातील गरजूंना त्याचा उपयोग होणार आहे.

 

 

            जिल्ह्यात आवश्यक तिथे त्या सर्व ठिकाणी विशेषत: दुर्गम भागात रुग्णवाहिकांबरोबरच इतरही सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत.  गत काही दिवसांत कोविडबाधितांची संख्या कमी होत असली तरी संभाव्य तिस-या लाटेचा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागासह सर्व यंत्रणांनी जागरूक राहाणे आवश्यक आहे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.  नागरिकांनीही सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विविध तालुक्यांसाठी रुग्णवाहिका

या नऊ रुग्णवाहिका अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे, चांदूर बाजार, चुरणी, वरूड, अचलपूर, तिवसा, जिल्हा स्त्री रुग्णालय व दर्यापूर येथील रुग्णालयांत उपलब्ध राहतील. त्याशिवाय, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आणखी पाच रुग्णवाहिका लवकरच जिल्ह्यात प्राप्त होतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी सांगितले.

            या रुग्णवाहिका ‘फोर्स मोटर्स’च्या असून, सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत.

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती