Thursday, May 20, 2021

म्युकरमायकोसिस नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा



म्युकरमायकोसिस नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा

कोरोनापश्चात रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक

नागरिकांमध्ये प्रभावी जाणीवजागृती करावी

-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

कुठलेही लक्षण आढळताच ईएनटी तज्ज्ञांशी संपर्क साधण्याचे आवाहन

अमरावती, दि. 20 : कोरोनाशी युद्ध सुरू असतानाच आता म्युकरमायकोसीस (काळी बुरशी) आजार या नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अथवा मधुमेह नियंत्रणात नाही अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराची लागण होताना दिसून येत आहे. प्राथमिक स्तरावर उपचार झाल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. त्यामुळे उपचारयंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा व इतर विभाग, वैद्यक क्षेत्र, विविध संस्था, संघटना आदी सर्वांनी मिळून नागरिकांमध्ये प्रभावी जाणीवजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.

म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी वैद्यक क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. बबन बेलसरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर,  सचिव डॉ. संदीप दानखेडे, डॉ. अजय डफळे, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. सरिता पाटणकर, डॉ. क्षितीज पाटील, डॉ. नीरज मुरके, डॉ. स्वप्नील के. शर्मा, डॉ. दिनेश ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

 

श्री. नवाल म्हणाले की, कोरोना पश्चात रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित नसणे, प्रतिकार शक्ती क्षीण होणे आदी कारणांमुळे या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. काळी बुरशी आजाराविषयी नागरिकांमध्ये जाणीवजागृती होणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणा, वैद्यक क्षेत्रासह विविध यंत्रणा, संस्था, संघटनांनी समन्वयाने प्रभावी जनजागृती करावी. प्राथमिक स्तरावर उपचार व काळजी घेतल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. त्यामुळे याबाबत कुठलीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ ईएनटी तज्ज्ञांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.    

        कोरोनाबाधितांवर उपचार करताना स्टेरॉईडचा अनावश्यक वापर होता कामा नये. कोरोनापश्चात रूग्णांनी वैयक्तिक स्वच्छता जपणे खूप महत्वाचे आहे. वेळोवेळी मास्क बदलणे, टुथब्रश बदलणे, दिवसातून दोनदा ब्रश करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले.

            कोरोनापश्चात रुग्णांशी कॉल सेंटरच्या माध्यमातून नियमित संपर्क ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

नेमका काय आहे ‘म्युकरमायकोसीस’

म्युकरमायसेटीस नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ती पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते मात्र जेव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते अशावेळेस म्युकरमायकोसीसची लागण होते. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस आणि सायनसेस वर दुष्परिणाम होतो. योग्यवेळी निदान व बुरशीप्रतिकारक उपचार केल्यास रुग्ण बरा होतो. प्रतिकारशक्ती कमी असलेली व्यक्ती, इतर दिर्घकालीन आजार मुख्यतः मधुमेह औषधोपचार ( स्टीरोइड्सचा गरजेपेक्षा जास्त वापर) कर्करोग पीडित रुग्ण यांना ह्या आजाराची लागण होताना दिसून येते.

लक्षणे

डोके दुखणे, चेहऱ्याला सूज येणे, ताप येणे, तोंडामध्ये गळू येणे व त्यामधून पू येणे, दातातून पू येणे, दात हलणे जबड्याचे हाड उघडे पडणे, हिरड्यांना सूज येणे व त्यातून रक्त येणे, सायनसेसमध्ये रक्तसंचय आढळणे, डोळ्यांना सूज येणे व हालचाल कमी होणे, चेहऱ्याची त्वचा काळी पडणे, अस्पष्ट दिसणे, नाकात काळे सुके मल तयार होणे, दात काढल्यानंतर न भरणारी जखम इत्यादी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे आढळल्यास दंत अथवा मुख आरोग्य तज्ञांकडून त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे.

काय करावे

§  रक्तातील साखर नियंत्रीत ठेवावी

§  मधुमेही रुग्णांनी आणि कोरोनातून बरे झालेल्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे

§  स्टेरॉईडचा वापर सांभाळून करावा

§  टुथब्रश, मास्क वरचेवर बदलणे

§  दिवसातून एकदा गुळण्या करणे

§  जमीनीखाली लागणा-या भाज्या नीट स्वच्छ धुवून खाव्यात.

§  ऑक्सिजन उपचाराच्यावेळेस ह्युमीडीफायरमध्ये स्टराईल वॉटर वापरावे

निदान आणि तपासणी

रुग्णाची योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. कोविड व स्टीरॉईडचा तपशील माहिती घेणे आवश्यक. रक्त तपासणी करणे. सी. टी स्कॅन, इंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्युकरमायकोसीसचे निदान करणे सोपे आहे

प्रत्येक कोरोनोबाधित व्यक्तिला हा आजार होतो असे नाही. कोरोना रुग्णांनी आपल्या मौखिक आरोग्याची निगा राखणे व काळजी घेणे हे गरजेचे आहे. कोरोनानंतर म्युकरमायकोसीसचा धोका असलेल्यानी १० ते २० दिवसांच्या आत तपासणी करून घेणे गरजेचे आहे व त्यामुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकतो, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

00000


1 comment:

  1. उपयुक्त माहिती आहे.

    ReplyDelete

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...