सहकारातून सामाजिक बांधीलकी जोपासावी
-पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
अमरावती  28:- सहकार चळवळीचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. सहकाराची व्याप्ती अधिक वाढवत गरजू वर्गासाठी विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जोपासावी, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.  
            सहकारी भारतीचे संस्थापक लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेतर्फे प्रशिक्षण व अधिवेशन अभियंताभवनात घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, आमदार सुनील देशमुख, सहकारी भारतीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष आशिष चौबीसा, दादारावजी भडके, निवेदिता दिघडे आदी उपस्थित होते.
श्री. पोटे- पाटील म्हणाले की, राज्यात सहकार क्षेत्राची व्याप्ती सर्वदूर आहे. या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वसामान्य  नागरिकांशी जनसंपर्क वाढवत सहकारी बँका व सोसायट्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत. याच भावनेतून मी पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना आवाहन करत असतो. या माध्यमातून सायकल, कपडे, पुस्तके आदी वस्तू अनेक गरजू लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे.  समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता ठेवून प्रत्येकाने काम केले पाहिजे. असे सामाजिक कार्य सहकार क्षेत्रातील मंडळींनी मिशन म्हणून राबवले पाहिजे, असेही ते म्हणाले.
       श्री. चरेगांवकर म्हणाले की,  सहकार क्षेत्राच्या विकासासाठी मनुष्यबळ व्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे. सहकारी बँका व सोसायट्यांमधील संचालक व कर्मचाऱ्यांना सर्व ठिकाणी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  रमेश टेंभरे यांनी सूत्रसंचालन केले.  
00000 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती