नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या कामांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
 योजनेच्या कामांना गती द्यावी
-         जिल्हाधिकारी अभिजित बांगर
अमरावती, दि. 13 : लहरी हवामानामुळे शेती क्षेत्रावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील 356 गावांसह एकूण 532 गावे या योजनेत समाविष्ट असून, कृषी विभागाने या कामाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या जिल्ह्यात करावयाच्या कामांच्या नियोजनाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सत्यजीत ठोसरे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
          श्री. बांगर म्हणाले की, या प्रकल्पातून शेती समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  शेतक-यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे व शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश आहे. यानुषंगाने शेतमालाच्या विपणनासाठी प्रभावी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय कृषी बाजाराच्या (ई-नाम) माध्यमातून अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे ई-व्यवहाराद्वारे शेतमाल विक्रीला अनेकविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य व शेतक-यांपर्यंत विविध बाजारांतील दरांची माहिती वेळेत पोहचेल अशी समन्वय यंत्रणा निर्माण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.    
 एकाच दिवशी झालेल्या जोरदार पावसाने काळी माती वाहून जाऊन नाल्यात साचण्याचा प्रकार काही ठिकाणी घडला. असे नाले जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून प्रवाहित करण्यात येतील, असेही ते म्हणाले.





                       प्रकल्पाची उद्दिष्टे
  • हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसीत करणे
  • अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी करणे
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी मूल्य साखळीमध्ये त्याचा सहभाग वाढविणे

              प्रकल्पाचे घटक

  • क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन
  • संरक्षित शेती
  • पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर
  • भूजल पुनर्भरण
  • काढणी पश्चात व्यवस्थापन    
  • शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी विक्री आदीबाबत सहाय्य
  • बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धींगत करणे
  • पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे
  • पिकांचे हवामानाकुल वाण
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
  • शास्त्रीय निर्देशांकाचा वापर करून प्रकल्पांतर्गत समुह पद्धतीने गावांची निवड
  • महसूल मंडळनिहाय उभारणी करण्यात येणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राकडून प्राप्त होणाऱ्या माहितीस अनुसरून शेतकऱ्यांना कृषी हवामान सल्ला
  • शिवारातील पाण्याच्या ताळेबंदानुसार पीक नियोजन
  • खारपाण पट्ट्यातील अकोला, अमरावती, बुलडाणा हे जिल्हे तसेच जळगाव जिल्ह्यातील  मुक्ताईनगर तालुका अशी एकूण 932 गावे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती