कीटकनाशक वापराबाबत लोकजागृती करण्याचे प्रशासनाला आदेश
  बंदी घातलेली कीटकनाशके विकणा-यांवर कठोर कारवाई करावी
-पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांचे निर्देश
          अमरावती, दि. 6 : कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत सर्वदूर जनजागृती करावी, तसेच सुरक्षित वापराचे निकष पूर्ण न करणारी कीटकनाशके विकणा-या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे दिले.
          श्री. पोटे- पाटील यांनी कृषी योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आदी यावेळी उपस्थित होते.
          श्री. पोटे -पाटील म्हणाले की, कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या विषबाधेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रत्येक गावातील शेतक-यांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. कीटकनाशके फवारताना मास्क, ग्लोव्ह्ज वापरणे, दुर्घटना घडल्यास तत्काळ उपचार देणे याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. काही लोकांकडून ठराविक रक्कम आकारुन एकरी फवारणी करुन दिली जाते. तथापि, फवारणीबाबतचे निकष पाळले जात नाहीत. काळजी घेण्याबाबत बेपर्वाईही केली जाते. मात्र, कृषी व आरोग्य खात्याने आपल्या यंत्रणांद्वारे गावागावात माहिती पोहचवून योग्य वापराची जाणीव जागृत केली पाहिजे.
         
          दुर्घटना घडल्यास तत्काळ उपचार आवश्यक - जिल्हा शल्यचिकित्सक
 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी यावेळी खालील माहिती दिली.
·        फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावरील मास्क यांचा वापर करावा.
·        कीटकनाशक पोटात गेल्यास किंवा त्वचा, डोळे, श्वसनेंद्रियाद्वारे विषबाधा झाल्यास व्यक्तीला अपघात स्थळापासून दूर नेऊन त्याचे कपडे बदलावे.
·        रुग्णाचे अंग / बाधित अवयव ताबडतोब साबण लावून स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करावेत.
·        कीटकनाशक पोटात गेले असल्यास रुग्णाला ताबडतोब ओकारी करण्याची उपाययोजना करावी.
·         दवाखान्यात नेताना किटकनाशकांच्या बाटलीसह डॉक्टरांकडे दाखवावे
·        रोग्याला पिण्यासाठी दूध तसेच बिडी/ सिगारेट व तंबाखू देऊ नये.
·        रोग्याला जास्त घाम येत असल्यास कोरड्या टावेलने पुसावा. थंडी वाजत असल्यास पांघरुण द्यावे.
·        श्वासोच्छवास तपासावा. श्वासोच्छवास अनियमित किंवा बंद असल्यास कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा.
·        झटके येत असल्यास दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी. बेशुध्द पडल्यास त्याला शुध्दीवर आणावयाचे प्रयत्न करावे.
·        बेशुध्द रोग्याला काहीही खाऊ घालू नये.
   
         
                            जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी यांनी खालील सूचना केल्या
·        पीकावर कीटकनाशकांची फवारणी शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसताना करावी. उष्ण, दमट व प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिनण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.
·        फवारणी करताना वारे वाहणाऱ्या दिशेला तोंड करुन फवारणी करावी. वारे वाहण्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करुन किटकनाशकांची फवारणी केल्यास फवारा शरीरावर पडून शरीरात विष भिनण्याची शक्यता असते.
·        फवारणी करताना जवळपास अन्य संबंधित व्यक्ती अथवा जनावरे यांची उपस्थिती असू नये.
·        ऑर्गेनोफॉस्फरस अथवा कार्बामेट अथवा क्लोरिन गटातील किटकनाशके (उदा. प्रोफॅनोफॉस, प्रोफॅनोफॉस + सायपरमेथ्रीन यांचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्युरॉन, इत्यादी. ) ही जहाल असल्याने त्यांच्या फवारणीच्यावेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
·        फवारणी करताना माहितीपत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, मिश्रणाचे प्रमाण योग्य राखावे.
·        शेतमालकाने अथवा शेतमजुरांनी विषारी किटकनाशके लहान मुले अथवा जनावरे यांच्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
·        फवारणी पूर्ण झाल्यानंतर साबणाने स्वच्छ हात व तोंड धुतल्याशिवाय काहीही खाऊ अथवा पिऊ नये.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती