Tuesday, August 11, 2020

‘ई- संजीवनी ओपीडी’द्वारे वैद्यकीय सल्ला

 

‘ई- संजीवनी ओपीडी’द्वारे वैद्यकीय सल्ला

सर्वदूर माहिती पोहोचवून अधिकाधिक गरजूंना लाभ मिळवून द्यावा

-       पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकू

 

अमरावती, दि.  11 : कोरोनाच्या संकटकाळात अन्य आजारांनी त्रस्त रूग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा म्हणून ई- संजीवनी ओपीडी ही टेलिकन्सल्टेशन सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची माहिती सर्वदूर पोहोचवून अधिकाधिक गरजू व्यक्तींना त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

 

कोरोनाबाबत विविध उपाययोजना होत असताना अन्य आजारांच्या रूग्णांना वेळेत वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणी आदी सुविधा मिळाव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा हे मोबाईल ॲप सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करता येते. कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्यामुळे इतर आजारांसाठीही रूग्ण अनेकदा रूग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांना या सुविधेमुळे घरबसल्या वैद्यकीय सल्ला उपलब्ध होणार आहे.  

 

या सुविधेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू व्यक्तींना लाभ मिळवून देण्यासाठी त्याची सर्वदूर माहिती पोहोचवावी. प्रत्येक तालुका रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत या सुविधेबाबत जनजागृती करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

 

व्हिडीओ संवादाची सोय

 

राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मेमध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली. त्यासाठी www.esanjeevaniopd.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. त्यानंतर लगेचच ॲपही सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. अनेक रूग्ण त्यावर संपर्क साधून वैद्यकीय सल्ला घेत आहेत. या सुविधेसाठी नामवंत तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला प्राप्त होत असून, कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो, अशी माहिती आरोग्य यंत्रणेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली. 

         

व्हिडीओ कॉलिंग करूनही वैद्यकीय सल्ला घेता येतो. त्यामुळे या सुविधेद्वारे रुग्ण हे तज्ज्ञांशी संपर्क साधून आपल्या आरोग्यविषयक शंकांचे निरसन करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सकाळी 9.30ते दुपारी 1.30 या काळात उपलब्ध असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जात नाही. रविवारी ही सेवा उपलब्ध नसते.  

 

या सुविधेसाठी मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो. लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते.  डॉक्टरांशी चर्चेनंतर  लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले

 

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...