Friday, August 14, 2020

रानभाज्यांच्या संवर्धनासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणार - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

रानभाज्यांच्या संवर्धनासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणार

-पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

                       








रानभाज्या महोत्सव व प्रदर्शनाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 

अमरावती, दि.14  : रानभाज्या हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्याची जपणूक व  संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक रानवैभवाला नाविण्यपूर्ण योजनेतून येत्या काळात हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आयोजित रानभाज्या महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य शशांक देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयंत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांनी रानभाज्या महोत्सव तथा प्रदर्शनातील रानभाज्यांच्या सर्व स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली व  त्यांची माहिती जाणून घेतली. या उपक्रमाच्या माध्यमातून रानभाज्यांचे औषधी गुणधर्माविषयी माहिती  नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आदिवासी  शेतकरी बांधवांना रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक  जिल्ह्यात व प्रमुख शहरांमध्ये  रानभाज्या महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात रानभाज्यांचे असलेले महत्व  अधोरेखित होणार आहे. रानभाज्या ही निसर्गाची देणगी असून कोणतेही रासायनिक खत किंवा मशागतीशिवाय त्या उगवतात. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या रोगाशी सामना करण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व  टिकविणे खूप गरजेचे आहे.  या रानभाज्या  प्रथिने, पोषणद्रव्य, व जीवनसत्वयुक्त असून  रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे रानभाज्यांना एक व्यावसायिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

 

लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही  शेतकरी बांधवांनी अन्नधान्य, दूध व भाजीपाला यांचा पुरवठा कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण न करता केला आहे. संपूर्ण देशात बळीराजा या कार्यात कायमच अग्रेसर राहीला आहे. त्यांचे हे योगदान मोठे आहे. कृषी विभागामार्फत आयोजित होणाऱ्या रानभाज्या महोत्सव हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील लोकांना रानभाज्याचे महत्व व फायदे कळणार आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांनी जोपासलेल्या रानांतील औषधीयुक्त व गुणकारी ठेवा लोकांपर्यंत पोहोचणार आहे. यातून आदिवासी बांधवांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात रानभाज्यांचा समावेश करण्यासाठी परसबागेत रानभाज्या लागवडीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.  

 

जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले, शेतकरी व समाज यांना जोडण्याची  चांगली संधी कृषी विभागाने या महोत्सवाचे आयोजन करून  दिली आहे. आदिवासी बांधवांच्या रानभाज्या जनतेपर्यंत पोहविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आगामी काळात शहरातील कृषी विभाग व शासनाच्या उपलब्ध जागांमध्ये  कायमस्वरूपी  बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी  जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. आज या महोत्सवात जवळपास 70 रानभाज्यांचे  प्रकार उपलब्ध आहेत व हा ठेवा आपणास जपायचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या रानभाज्यांचे औषधीयुक्त गुण लोकांना माहिती व्हावे, यासाठी कृषी विभागाने पुस्तिकेच्या माध्यमातून माहिती द्यावी तसेच नागरिकांनीही रानभाज्यांचा आपल्या आहारात उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

 

मेळघाटात व  परिसरात उगवणाऱ्या रानभाज्या  विशिष्ट ऋतूमध्ये उगवणाऱ्या भाज्या आहेत. नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्यांचा भोजनात उपयोग हा मनुष्याच्या शरीरासाठी गुणकारी आहे. शेवगा, कढीपत्ता यासारख्या रानभाज्या ह्या औषधीयुक्त असून त्याचा जेवणात उपयोग झाला पाहिजे. कृषी विभागाव्दारे आयोजित रानभाज्या महोत्सव हा चांगला उपक्रम असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी व्यक्त केले.

या महोत्सवाच्या माध्यमातून शहरी भागातील लोकांना रानभाज्याविषयी माहिती मिळेल व त्यांचा दैनंदिन भोजनात उपयोग होईल. पावसाळी आजारापासून बचाव होण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रानभाज्या महत्वपूर्ण आहेत, असे कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी यावेळी सांगितले.

रासायनिक शेती पध्दतीमुळे रानभाज्याचे महत्व कमी होत आहे. शेतकऱ्यांचा कल हा पारंपारिक पध्दतीच्या पिकांकडेच जास्त आहे. पण रानभाज्यांच्या लागवडीमुळे किंवा उत्पादनातून शेतकऱ्यांना निव्वळ नफा मिळू शकतो. कटूलेसारख्या पिकांची बांधावर पेर केल्यास पावसाळी ऋतूमध्ये त्याचे चांगले उत्पादन घेता येऊ शकते. अनेक रानभाज्या ह्या औषधीयुक्त असून त्याचे सेवन मानवी शरीरासाठी उपयुक्त आहे. महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्याचे महत्व सर्व लोकांना कळणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात सांगितले.

यावेळी कार्यक्रमात ‘ओळख  रानभाज्यांची’ या माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात विविध गावांतून आलेल्या शेतकऱ्यांनी  जवळपास 70 रानभाज्यांचे स्टॉल्स उभारले होते.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...