जिल्हा
कोविड रूग्णालयात आपत्कालीन सेवा कक्षाचा शुभारंभ
कोरोनाविरूद्धच्या
लढाईतील तुम्हीच खरे सैनिक
पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा आरोग्य कर्मचा-यांशी संवाद
आरोग्य
सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध प्रयत्न
अमरावती, दि. 15 :
रूग्णसेवा हे सर्वात मोठे कार्य आहे. कोरोना संकटात निरंतर आरोग्य सेवा बजावत
तुम्ही देशसेवेचे कार्य करत आहात. कोरोनाविरूद्धच्या लढाईतील तुम्हीच खरे सैनिक
आहात, अशा शब्दांत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती
ठाकूर यांनी आज आरोग्य कर्मचा-यांशी संवाद साधला.
सुपर स्पेशालिटी
रूग्णालयातील जिल्हा कोविड रूग्णालयाच्या आपत्कालीन सेवा कक्षाचे उद्घाटन आज
पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.
श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांच्यासह कोविड रूग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व कर्मचा-यांशी संवाद साधून त्यांना
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सेवारत कर्मचा-यांच्या
निवासी वसतिगृहाला भेट देऊन तेथील कर्मचा-यांनाही शुभेच्छा दिल्या.
कोरोनाच्या
लढाईत डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार हे जीवाची जोखीम पत्करून
रूग्णसेवा बजावत आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पालकमंत्री
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना महासंकटाच्या मुकाबल्यासाठी
आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. कोरोनाची साथ
लक्षात घेऊन अत्यंत अल्प कालावधीत जिल्हा कोविड रूग्णालय उभारून त्यानंतर शहरात
इतरही ठिकाणी,तसेच तालुक्यांतही कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. स्थानिक
स्तरावर चाचणी उपलब्धतेसाठी विद्यापीठात लॅबही सुरू करण्यात आली. आता डॉ. पंजाबराव
देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळाही लवकरच सुरू होईल. यापुढेही
सुविधांचा विस्तार करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात
साथरोग नियंत्रण रूग्णालयेही उभारण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कोविड
रूग्णालयात कॅज्युअल्टी कक्षाची सुविधा उभारण्यात आली असून, तिथे सोळा खाटा उपलब्ध
करून देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन सुविधा व इतर सुविधाही तिथे देण्यात आल्या आहेत,
असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment