Monday, August 24, 2020

नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 




पालकमंत्र्यांकडून तिवसा येथील विकासकामांचा आढावा
नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करावी

-        पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 24 :  तिवसा शहरात पाणीटंचाई भासू नये म्हणून प्रस्तावित असलेली पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी  वर्धा नदीवर बंधारा मंजूर करण्यात आला आहे. या बंधारेचे काम नियोजनबध्द व गतीने पूर्ण करुन नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यात यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

तिवसा नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, तिवसा नगर पंचायतचे नगराध्यक्ष वैभव वानखडे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, मजीप्राचे अधिक्षक अभियंता एस. एम. कोपुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तिवसा नगर पंचायतच्या मुख्याधिकारी पल्लवी सोटे, अचलपूरच्या मुख्याधिकारी गिता वंजारी, समाजकल्याण सहा. आयुक्त मंगला मून आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, तिवसा शहरातील गोर-गरीबांना हक्काचे घरकुल मिळण्यासाठी रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रलंबित कामे व योजनेचा तीसरा टप्पा तत्काळ वितरीत करण्यात यावा. तिवसा शहराला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी पुरवठा योजनेची कामे गतीने पूर्ण करावीत. प्रस्तावित मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह बांधकामाचे काम पूर्ण करण्यासाठी भूखंड मोजणी, इस्टीमेट आदी कामे गतीने पूर्ण करावी. तिवसा शहरात धान्य गोदामासाठी न्यायालयाजवळील जागा नियोजित झाली असून बांधकामासाठी नाबार्डकडून निधी मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. वणी ममदापूर व बोर्डा येथील आरोग्य उपकेंद्रासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून 75 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून येत्या काळात उपकेंद्राचे बांधकाम सुध्दा सुरु होणार आहे. नगरोत्थान योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून मुलभूत सुविधांची कामे प्राधान्याने करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागरी सुविधांच्या कामांसाठी प्राप्त निधीचा विनियोग हा उद्दिष्टानुसारच झाला पाहिजे. त्याचप्रमाणे, सर्व प्रभागांना न्याय मिळाला पाहिजे. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधीचा विनियोग हा त्या योजनेच्या निकषांनुसार व संबंधित परिसराच्या विकासासाठीच वापरला पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊनच नागरी सुविधांची कामे करावीत. यासंबंधात तक्रारी येता कामा नये, असेही निर्देश श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

 

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...