Sunday, August 16, 2020

उमेद अभियानात ‘जागर अस्मितेचा’ मोहिमेचा शुभारंभ

 

उमेद अभियानात ‘जागर अस्मितेचा’ मोहिमेचा शुभारंभ

मोहिमेत अधिकाधिक गटांना सहभागी करून घ्यावे

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 16 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत उमेद अभियानात ‘जागर अस्मितेचा’ ही मोहिम 31 ऑगस्टपर्यंत सर्वदूर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अमरावती जिल्ह्यातील अधिकाधिक गटांना सहभागी करून घेण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.

 

उमेद अभियानामार्फत 15 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत जागर अस्मितेचा हि मोहीम  राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत अस्मिता प्लस योजनेचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्वातंत्र्यदिनी झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, जिल्हा परिषदेचे अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती पूजाताई आमले, शिक्षण व बांधकाम सभापती श्रीमती प्रियंकाताई दगडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख आणि उमेद चमू उपस्थित होती.

महिलांचे आरोग्य सुरक्षितता व जाणीव जागृतीसाठी ही मोहिम उपयुक्त ठरेल. मोहिमेत अधिकाधिक गटांना सहभागी करून घेत जिल्ह्यात सर्वदूर मोहिमेची भरीव अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.अभियानाबाबत माहिती देताना अभियानाचे व्यवस्थापक श्री. देशमुख म्हणाले की, या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती करून अस्मिता प्लस  हे सॅनिटरी नॅपकिन माफक दरामध्ये माताभगिनींना उपलब्ध करून देणे आहे. त्याचप्रमाणे, स्वयं सहाय्यता समूहातील महिलांना माफक दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून विक्रीमधून उपजीविकेचे साधन निर्माण करणे हा आहे.  

यावेळी स्वयं सहाय्यता समूहातील महिलांना “अस्मिता प्लस” च्या कीटचे वितरणही करण्यात आले. मोहिमेच्या छोट्या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी झाले.स्वयंसहायता गटांची चळवळ ही महिलांना विकासाच्या मुख्यधारेत आणणारी महत्त्वाची चळवळ आहे. त्यामुळे जागर अस्मितेचा मोहिमेत जास्तीत जास्त गटांनी सहभाग़ी होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे राज्यव्यापी ऑनलाईन महिला उद्बोधन मेळावाही घेण्यात आला आहे. महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती आणून बचत गटांना अर्थार्जनाचे माध्यम उपलब्ध करून देणे हाही या अभियानाचा हेतू असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

त्याशिवाय,  ‘एक ग्रामपंचायत एक बीसी सखी’ या उपक्रमाला अधिक गती मिळण्याकरीता ‘उमेद महिला सक्षमीकरण-बीसी सखी / डिजी पे सखी अभियान’ राबविण्यात येणार असून या मोहिमेतून ग्रामस्थांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले आहे. याबाबतही उमेद अभियानाच्या जिल्हा कक्षाकडून नियोजन करण्यात येत आहे. कोरोना संकटामुळे निर्माण झालेली स्थिती ही अर्थाजनाच्या संधीत परावर्तित करून गटांना सक्षम करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

 

00000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...