*कापूस खरेदीतील अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न*
अमरावती, दि. २२. राज्य शासनाने यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी केली आहे. पुढील हंगामातही कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदी शिवाय राहू नये यासाठी शासनाकडून कापूस खरेदीत येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्याचे नियोजन होत असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
गत १० वर्षात झाली नाही एवढी विक्रमी कापूस खरेदी राज्यात झाली आहे. जिल्ह्यातही कापूस खरेदीला वेग येण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सातत्याने प्रयत्न व शासन स्तरावर पाठपुरावा केला. पणन महासंघाचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासनासोबत त्यांनी सतत बैठका व चर्चेतून अनेक निर्णय घेतले. त्यात गोदामांची संख्या वाढवणे, जीनची संख्या वाढवणे, मनुष्यबळ उपलब्धता, कापूस खरेदी केंद्रांची संख्या वाढणे असे विविध निर्णय अमलात आणून कापूस खरेदीला गती मिळाली.
महाविकास आघाडी शासन
कापूस उत्पादक बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यापुढील हंगामातही कापूस खरेदीत अडथळे येऊ नयेत म्हणून नियोजन होत असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
कापूस पणन महासंघाच्या अडचणीसंदर्भात राज्यस्तरावर बैठकही नुकतीच झाली असून, भविष्यातील कापूस खरेदीबाबत अडचणी येऊ नये म्हणून तत्पूर्वीच उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यात यंदा कापसाची विक्रमी खरेदी झाली आहे. महासंघाने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कापूस खरेदी केली आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडू नये याची काळजी राज्य शासन आणि पणन महासंघाने घेतली आहे. राज्य शासन कापूस पणन महासंघासमोरील कापूस खरेदी संदर्भातील सर्व अडचणी सोडवून योग्य त्या उपाययोजना करेल तसेच दि कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियासोबत(सीसीआय) बैठक घेऊन या अडचणींतून मार्ग काढला जाणार आहे. त्यामुळे पुढील हंगामात सुद्धा जर एवढ्या मोठया प्रमाणात कापूस खरेदी करावी लागली तर अडचणी येणार नाहीत त्यासाठी या उपाय योजना तातडीने करण्यात येणार आहेत.
०००
No comments:
Post a Comment