Wednesday, August 19, 2020

सर्व नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनआरोग्य योजनेला मुदतवाढ

सर्व नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

·        जिल्ह्यात आतापर्यंत सव्वादोन हजार लाभार्थ्यांना लाभ; 22 रूग्णालयांचा समावेश

 

 

अमरावती, दि. 19: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले  जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याच्या शासनाच्या निर्णयाला आता 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणार आहेत, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

 

यापूर्वी राज्यातील 85 टक्के नागरिकांचा या योजनेत समावेश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उर्वरित 15 टक्के नागरिकांचाही समावेश यापूर्वीच करण्यात आला. त्यानुसार 100 टक्के नागरिकांचा योजनेत समावेश झाला होता. ही योजना 31 जुलैपर्यंत अंमलात होती. मात्र, कोरोनाची साथ लक्षात घेता तीन महिने आणखी मुदतवाढ मिळाली आहे. तसा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केला आहे.

 

आरोग्यविषयक हमी आणि आर्थिक दिलासा

 

राज्यात सध्या कोविड-19 च्या रूग्णसंख्येत झालेली वाढ, तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील नागरिकांना मिळत असलेला लाभ लक्षात घेता तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. महामारीच्या संकटामध्ये सर्वच नागरिकांना आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा यासाठी महाविकास आघाडी शासनाने हा निर्णय घेतला आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरीता या दोन्ही योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी उपचार घेता येणार आहेत.

 

 

 

 

                        जिल्ह्यात सव्वादोन हजार लाभार्थ्यांना लाभ; 22 रूग्णालयांचा समावेश

 

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 996 उपचार व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 1209 उपचार पुरविले जातात. राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले  जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील नागरिकांनासुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय 996 उपचार पद्धतींचा लाभ मान्यता प्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील 22 रूग्णालयांचा समावेश आहे. दि. 1 एप्रिलपासून जुलै अखेरपर्यंत 2 हजार 298 लाभार्थ्यांनी 4 हजार 182 शस्त्रक्रियेद्वारे लाभ घेतला, अशी माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन सानप यांनी दिली.  

 

शासनाच्या निर्णयानुसार शासकीय रुग्णालयांकरीता राखीव असलेल्या 134 उपचारापैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवणयंत्राचा उपचार वगळता 120 उपचार अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये करण्यात येतील.  लाभ घेण्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळी,  केशरी,  पांढरी शिधापत्रिका, तहसीलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यांपैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून सादर करावा लागेल. त्याबरोबरच शासनमान्य फोटो ओळखपत्र देणे आवश्यक राहील. कोरोनाच्या साथीचे गांभीर्य आणि उपचाराची तातडी पाहता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबाबत शिथिलता देण्याचे अधिकार राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

            या 22 ठिकाणी मिळणार उपचार

या योजनेत जिल्ह्यातील 22 रूग्णालयांचा समावेश आहे. त्यात जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हा स्त्री रूग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, दर्यापूर, मोर्शी, धारणी व अचलपूर उपजिल्हा रूग्णालये, परतवाड्याचे भन्साळी हॉस्पिटल, धारणीचे सुशीला नायर हॉस्पिटल, अमरावतीचे आरोग्यम इन्स्टिट्यूट, सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. बारब्दे हॉस्पिटल, देशमुख आय हॉस्पिटल, हायटेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मातृछाया हॉस्पिटल, संकल्प डायलिसिस सेंटर, श्री अच्युत महाराज रूग्णालय, सुजाण कॅन्सर हॉस्पिटल, तसेच वरूड, चांदूर बाजार व नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रूग्णालय आदींचा समावेश आहे.

                                    000

 

 

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...