Tuesday, August 18, 2020

पालकमंत्र्यांकडून चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर विकासकामांचा आढावा

 



पालकमंत्र्यांकडून चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर विकासकामांचा आढावा

नागरी सुविधांची प्राधान्याने पूर्ण करावी

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 18 : नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होत असताना नागरी सुविधांच्या कामांकडे दुर्लक्ष होता कामा नये. ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

          जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा व इतर कामे, तसेच नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत क्षेत्रातील विविध कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, मुख्याधिकारी गीता वंजारी व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नगरपालिकेअंतर्गत येणारी कामे राबवत असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे पूर्ण करावी. लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊन नियोजन करावे. नागरी विकासाच्या कामांसाठी प्राप्त निधीचा विनियोग हा उद्दिष्टानुसारच झाला पाहिजे. त्याचप्रमाणे, सर्व प्रभागांना न्याय मिळाला पाहिजे.

दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधीचा विनियोग हा त्या योजनेच्या निकषांनुसार व संबंधित परिसराच्या विकासासाठीच वापरला पाहिजे. काटेकोरपणे ही कार्यवाही करावी. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन कामे करावीत. यासंबंधात तक्रारी येता कामा नये, असेही निर्देश त्यांनी दिले.

नगरपालिकेच्या हद्दीतील गावठाण जमीनीवर बांधकाम परवानगीस सतत अडथळे येत असल्याच्या तक्रारी येतात. मात्र, सन 2000 पूर्वीचे पुरावे सादर केले तर परवानगी देण्यास हरकत नसल्याचे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी स्पष्ट केले. असे प्रस्ताव खोळंबून ठेवू नयेत. वेळीच परिपूर्ण माहिती घेऊन त्याची परवानगी प्रक्रिया राबवली पाहिजे. सात दिवसांच्या आत परवानगी दिली पाहिजे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी सांगितले.

                            

पालकमंत्र्यांच्या हस्ते अपंग बांधवाला धनादेश सुपुर्द

अमरावती येथील नागरिक रोशन धांदे यांना दोन्ही पायांना काही दिवसांपूर्वी अपंगत्व आले. त्यामुळे त्यांना सहकार्याचा हात म्हणून रतन इंडिया कंपनीच्या सौजन्याने अडीच लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते आज सुपूर्द करण्यात आला. रोशन, एक बहीण म्हणून मी तुमच्या कायम पाठीशी असेल, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी श्री. धांदे यांना दिलासा दिला.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...