Wednesday, July 10, 2019

कायदा व सुव्यवस्थेबाबत पालकमंत्र्यांनी घेतला आढावा अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांनी दक्षता बाळगावी - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. 10 : जिल्ह्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा खून झाला. या घटनांच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, तसेच अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी अधिक दक्ष राहून काम करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज दिले.
काल अर्पिता दत्तात्रय ठाकरे आणि सौरभ राजेंद्र गोसावी या दोघांच्या खूनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत व्हीडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून पूणे येथून संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्याम घुगे, उपायुक्त श्री. सोळंके आदी उपस्थित होते.
            श्री. बोंडे म्हणाले, जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचा खून ही निंदणीय घटना आहे. पोलिसांनी याबाबत तातडीने दोषारोपपत्र सादर करावे. पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी दक्ष राहावे. यापुढे जिल्ह्यात अशा घटना घडू नये, यासाठी सोशल पोलिसींग करावे. पोलिस विभागाने लव्ह ट्रॅपबद्दल शाळा, महाविद्यालयामधून विशेष मोहिम राबवून जनजागृती करावी. विद्यार्थी आणि पालकांना अशा प्रकारांच्या दुष्परिणाबाबत माहिती देऊन जागृती करावी. पालकांना मुला-मुलींच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याचे सांगावे. त्यांच्याशी प्रेमाने विचारविनिमय करावेत. मोबाईल, टीव्हीच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्पपरिणामाबाबत माहिती द्यावी.
पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणे, बगीचे, रस्ते अशा ठिकाणच्या युवक-युवतींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे. काही अपरिहार्य आणि अनुचित प्रकार आढळल्यास तातडीने कारवाई करावी. महिला पोलिस असलेल्या दामिनी पथकांना अशा ठिकाणी कारवाई करण्याचे कळवावे. पोलिसांनी अधिक प्रमाणात गस्त घालावी.
            दारुमुळे संसार उद्धवस्त होतात. हिंसाचार होऊन मारामारी, खूनाचे प्रमाण वाढते. जिल्ह्यात अशा घटना घडू नये, यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील अवैध दारु विक्रीवर तत्काळ कारवाई करावी. परमीट बार व दारु विक्रीच्या गेटवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे बंधनकारक करावे. बारच्या गेटवर सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे आदेश देण्यात यावे. दोन्ही खूनाच्या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करावे. पोलिसांनी दक्ष राहून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर पूर्णपणे अंकूश बसवावा.
            पोलिस आणि महसूल विभागाने जिल्ह्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी हेल्पलाईन नंबर जाहिर करावा. हेल्पलाईन 24 तास कार्यान्वित राहील आणि त्यामार्फत तातडीने कारवाई होईल, अशी उपाययोजना आखावी. विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांमध्ये अशा घटनाविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवून प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी द्यावी, अशा सूचनाही श्री. बोंडे यांनी यावेळी दिल्या.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...