Friday, July 26, 2019

पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शासनाचा उपक्रम मुलींना कणखर करण्यासाठी स्वयंसिद्धा प्रशिक्षण कार्यक्रम







अमरावती, दि. 26  युवतींना शारीरीक व मानसिकदृष्ट्या कणखर बनविण्यासाठी कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातून प्रारंभीच्या टप्प्यात सुमारे 80 हजार मुलींना कराटे, लाठीकाठी व मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  
पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी या उपक्रमाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना आज दिली. आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस आयुक्त संजय बाविसकर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.
उपक्रमाबाबत बोलताना डॉ. बोंडे म्हणाले की, युवतीवर हल्ला होऊन तिचा बळी जाण्याची दुर्देवी घटना जिल्ह्यात घडली. अशा घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने विविध विभागांच्या समन्वयातून स्वयंसिद्धा हा उपक्रम जिल्हाभर राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुलींमध्ये स्वसंरक्षणाची जाणिव निर्माण करण्याचा उपक्रमाचा हेतू आहे.
उपक्रमात 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक शाळेच्या 2 मुली व क्रीडा शिक्षक मिळून 2 हजार 250 मुलींना तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी 31 मास्टर ट्रेनर्सचीही नियुक्ती करण्यात आली आहे. 8 ते 13 ऑगस्टदरम्यान शाळांतून कराटे, ॲरोबिक्स, मार्शल आर्ट प्रशिक्षण दिले जाईल. 15 ऑगस्टला विभागीय क्रीडा संकुलात पाच हजार मुलींचे एकत्रित प्रात्यक्षिक होणार आहे.  सुरुवातीला 80 हजार मुली प्रशिक्षित करण्याचे नियोजन आहे. मात्र, हा उपक्रम पुढील काळातही सुरु राहील, असे पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, आपली मुलगी सक्षम व कणखर व्हावी ही जाणिव पालकांच्या मनात जागृत करण्याचे काम या उपक्रमाद्वारे होणार आहे. हा केवळ विशिष्ट कालावधीपुरता उपक्रम नसून, तो पुढेही कायमस्वरूपी चालविला जाईल. बेटी बचाओ, बेटी पढाओ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले मिशन आहे. त्याला उपक्रम जोडून घेतला जाईल.
पोलीस आयुक्त श्री. बाविस्कर म्हणाले की, गुन्हेगारीला आळा बसावा व महिला वर्ग, तसेच नागरिकांमध्ये विश्वास, सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून भरोसा, पोलीस काका- काकी, प्रतिसाद हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वयंसिद्धा हा उपक्रम कुमारवयीन मुली, तरूणी यांना कणखर बनविण्यास उपयुक्त ठरेल. याबाबत स्वयंसिद्धा ही माहितीपर पुस्तिकाही वितरीत करण्यात येईल.
पोलीस ठाण्यात तक्रारींची नोंद करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी येतात. तथापि, केवळ प्रत्यक्षच नव्हे तर पोलिसांकडून दूरध्वनी, ई-मेल, सोशल मीडिया, एसएमएस आदी कुठल्याही माध्यमातून तक्रार आल्यास दखल घेतली जात आहे. नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे, असे आवाहन श्री. बाविस्कर यांनी केले.

पोलीस आयुक्त श्री. बालाजी म्हणाले की, मुलांमध्ये स्वसंरक्षणाची जाणिव निर्माण व्हावी म्हणून पाश्चात्य देशांत बालवयापासूनच ‘गुड टच’, ‘बॅड टच’ आदी जाणिवा निर्माण केल्या जातात व स्वसंरक्षणाच्या पद्धतींचे शिक्षण दिले जाते. आपल्या समाजातही असे शिक्षण रुजविण्याची गरज आहे. त्यासाठी हा उपक्रम आदर्श ठरेल.
हा उपक्रम शारिरीक शिक्षणाचे अविभाज्य अंग व्हावा, असा प्रयत्न असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.  

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...