Saturday, July 27, 2019

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ संपर्क साधावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



            अमरावती, दि. २७ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान योजना) योजनेत पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा सूचना विज्ञान केंद्राच्या (nic) संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून, योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. अद्यापही लाभ  न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांनी तत्काळ तलाठी, कृषी सहायक यांच्याशी आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची व्याप्ती वाढली असून अनेक शेतकरी बांधवांना त्यामुळे लाभ मिळणार  आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी गावात ही प्रसिध्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे. योजनेच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व कृषी प्रशासनाला दिले आहेत.
          शेतकऱ्यांना थेट मदत व्हावी यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरात राबविण्यात येत असून योजने अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये प्रमाणे तीन टप्प्यात जमा करण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी विभागाने व महसूल, तसेच ग्रामविकास प्रशासनाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.  योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी दोन हेक्टर शेतीची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणांनी कार्य करावे. जिल्ह्यात असणाऱ्या एकूण पात्र शेतकऱ्यांपैकी एकही शेतकरी सुटू नये यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
पात्र शेतकरी बांधवांनी तात्काळ आपल्या गावातील तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आधारकार्ड, बँक पासबुक प्रत आदी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन श्री. नवाल यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...