Tuesday, July 16, 2019

शेतकरी सन्मान योजनेबाबत तक्रार निवारणासाठी समिती पीक कर्ज वितरणाला गती द्यावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल





अमरावती, दि. 16 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबाबत तक्रार निवारणाकरीता प्रत्येक तालुक्यात समिती गठित करण्यात आली असून समितीने वेळोवेळी बैठका घेऊन तक्रारींचे निवारण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले. त्याचप्रमाणे, खरीप कर्ज वाटपाचे प्रमाण जुलै अखेरपर्यंत 55 टक्क्यांहून अधिक करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. नवाल यांनी पीक कर्ज व विविध योजनांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.  
शेतकरी सन्मान योजनेत बऱ्याच कर्ज खात्यांवर अपूरी माहिती, चुकीची माहिती, चुकीचे फ्लॅगिंग यामुळे प्रक्रिया होऊ शकली नाही. या प्रकरणी प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात समिती गठित करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) हे समितीचे अध्यक्ष असून सहकारी, अग्रणी बँकेचे प्रतिनिधी, लेखापरीक्षक, सहकार अधिकारी हे सदस्य आहेत. या समितीने नियमित बैठकांद्वारे तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.  
खरीप पीक कर्ज वितरणाचा आढावा घेताना ते म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेतर्फे 28 टक्के, राष्ट्रीयकृत व्यापारी बँकातर्फे 18 टक्के व ग्रामीण बँकेतर्फे 25 टक्के कर्ज वितरण झाल्याचे दिसते. हे प्रमाण अत्यंत कमी असून येत्या पंधरवड्यात ते 55 टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न करावा. बँकांनी अधिकाधिक मेळावे घेऊन त्याची पूर्वप्रसिद्धीही करावी. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती ठळकपणे शाखेत मांडावी.
00000



No comments:

Post a Comment