विदर्भातील पहिल्या विमानतळ विस्ताराचे शनिवारी भूमिपूजन





*मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन
*जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार
*वर्षभरात प्रवासी वाहतूक करण्याचे नियोजन
अमरावती, दि. 11 : शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टीने विकसित होत असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरण शनिवारी, दि. 13 जुलै रोजी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता विदर्भातील पहिल्या विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपूजन पार पडणार आहे.
अमरावती ही राज्यातील सर्वात जुनी कापड बाजारपेठ आहे. त्यासोबतच शहरालगतच्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योगामुळे झपाट्याने औद्योगिकरण होत आहे. या औद्योगिक विकासाला पुरक ठरण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण लाभाचे ठरणार आहे.
बेलोरा विमानतळावर सध्या 1372 मीटरची धावपट्टी आहे. या धावपट्टीवर केवळ लहान विमाने उतरू शकतात. विस्तारीकरणामुळे 72 आणि 90 आसन क्षमता असणारी प्रवासी आणि मालवाहू विमाने उतरू शकतील. विस्तारीकरणात धावपट्टीची लांबी, रूंदी वाढविणे, विमानांच्या पार्किंगसाठी जागा विकसित करणे, टॅक्सी, आयसोलेशन मार्ग तयार करणे, पेरीमिटर रस्ता, पोचमार्ग, सांडपाणी व्यवस्था आदी कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेलोरा विमानतळ परिसरात होणार आहे.
यावेळी यवतमाळ-बडनेरा वळण मार्ग, पाणीपुरवठा योजना, विद्युत वाहिन्या हलविणे आदी कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात टर्मिनल बिल्डींग, एटीसी टॉवर, नाईट लॅण्डींग सुविधा आदी कामे केली जाणार आहे. यामुळे येत्या वर्षात प्रवासी आणि माल वाहतूक सुरू होऊ शकेल. विमानतळ विस्तारीकरणामुळे जिल्ह्यातील औद्योगिक व वाणिज्यिक विकासास चालना मिळेल.
जगभरात विशेषत: भारतात हवाई प्रवासी व माल वाहतूक ही दोन्ही क्षेत्रे प्रचंड वेगाने वाढत आहेत. हवाई प्रवास हा चैनीचा नव्हे तर अत्यावश्यक होण्याच्या मार्गावर आहे. हवाई वाहतुकीमुळे वेळेच्या बचतीसोबतच उत्पादीत माल बाजारपेठेत कमी वेळेत पोहोचविता येणे शक्य आहे, यासाठी विदर्भातील अमरावती येथील बेलोरा विमानतळाचा विकास करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी सांगितले.
विमानतळ विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह विभागातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती