राज्यातील पहिल्या स्फुरद समृद्ध खत निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन एका वर्षात उत्पादन सुरू करावे - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे








अमरावती, दि. २२ : प्रॉम खत निर्मिती कारखान्यामुळे जैविक खत निर्मितीसह पर्यावरणही जपले जाईल व रोजगारालाही चालना मिळेल. एका वर्षात हा कारखान्यातून उत्पादन सुरू व्हावे, असे निर्देश  राज्याचे कृषी मंत्री तथा राज्य कृषी उद्योग महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी आज मायवाडी येथे दिले.

मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे संत्रा प्रक्रिया केंद्रात महाराष्ट्रातील पहिल्याच शासकीय कृषी उद्योग प्रॉम (फॉस्फेट रिच ऑरगॅनिक मॅन्युअर) व निंबोळी अर्क/ पेंड प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम , श्रीमती वसुधाताई बोंडे, महामंडळाचे संचालक पियूष कारंजकर, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दिलीप ब्राह्मणकर   , उद्योजक संजय जाधव  आदी उपस्थित होते.   प्रारंभी कृषी मंत्र्यांनी ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिक पाहणी केली. 

डॉ. बोंडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिली. हा केवळ माझा नसून मोर्शी वरुडमधल्या जनतेचा बहुमान आहे. कृषी क्षेत्रातील विविध बाबींच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना आदी शेतकरी हिताचे अनेक निर्णय राबविण्यात येत आहेत. 

संत्रा प्रक्रिया उद्योग ठाणाठूनी येथे उभारण्यात आला असून लवकरच तिथे उत्पादन सुरू होऊन त्यासाठी ३०० टन संत्रा वापरला जाणार आहे. संत्रा उत्पादक  शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिसरात मत्स्य विज्ञान महाविद्यालय लवकरच सुरू होत आहे. कृषी आणि फलोत्पादन विज्ञान महाविद्यालय आणण्याचा प्रयत्न आहे. गव्हाण कुंडला सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल. 
शासनाकडून सिंचनाचे प्रमाण वाढविणे, ते पाणी शेतापर्यंत नेणे आणि ठिबक आदी अद्यावत सिंचन प्रणालीद्वारे पाणी पिकाला देणे व पिकाची उत्पादकता वाढवणे आदी समग्र विचार करून विविध योजना अंमलात आणल्या जात आहेत, असे ते म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, खतांच्या अतिरिक्त वापराने जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे जैविक खते वापरणे हा चांगला उपाय आहे. प्रोम हे खत केवळ ६५० रुपयात दिले जाईल. पर्यावरणाला पूरक अशी निर्मिती आहे. यापुढे असे कारखाने ठिकठिकाणी उभारण्यात येतील. 
निंबोलीपासून अर्क, तेल काढण्याचा आणि त्यापासून कीटनाशकाचा कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 


प्रगतीशील शेतकरी बांधवांचा सत्कार यावेळी कृषी मंत्र्यांच्या हस्ते झाला.

कृषी उद्योग महामंडळाचा राज्यातील पहिला स्फुरदसमृद्ध सेंद्रिय खत (प्रॉम) कारखाना मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे सुरू होणार आहे. 

            कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत राज्य कृषी उद्योग महामंडळातर्फे हा कारखाना उभारण्यात येणार आहे. दिवसेंदिवस रासायनिक खताचा अतिरिक्त वापर होत असल्याने जमीनीची सुपीकता कमी होत आहे. त्याला पर्याय म्हणून शेतक-यांना जैविक खतांचा वापर करण्यासाठी उद्युक्त करण्याच्या दृष्टीने स्फुरद समृद्ध सेंद्रिय खत कारखान्याची उभारणी करण्यात येत आहे.

            प्रॉम या सेंद्रिय खतामध्ये मुख्य, दुय्यम व सूक्ष्म मुलद्रव्यांसह जमीनीतील जीवाणूंना आवश्यक असणारे सेंद्रिय कार्बन असतो. प्रॉम खतामुळे अल्कधर्मी व आम्लधर्मी अशा दोन्ही प्रकारच्या सामूचा (पीएच) समतोल (न्यूट्रलायझेशन) साधला जातो. त्यामुळे या खतनिर्मितीचा कारखाना काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उद्योग महामंडळाची 1965 पासून दर्जेदार उत्पादनांची मालिका आहे. प्रॉम खताच्या निर्मितीमुळे या मालिकेत भर पडणार आहे.
---------
**प्रॉम वैशिष्ट्य
 
- हे खत नियमन अध्यादेशानुसार मान्यताप्राप्त
-जैविक, भौतिक व रासायनिक सुपीकता वाढते.
-अन्नद्रव्यांसह सेंद्रिय कर्ब हा घटकही असतो.
-खत व त्यातील तत्वांचे जमिनीत विरघळण्याचे १०० टक्के प्रमाण
- जमिनीत सामुचे योग्य प्रमाण राखले जाते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती