जिल्हाधिका-यांकडून आढावा पल्स पोलिओ लसीकरण 23 जानेवारीला

 





जिल्हाधिका-यांकडून आढावा

पल्स पोलिओ लसीकरण 23 जानेवारीला

 

अमरावती, दि. 4 :  जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण 23 जानेवारीला होणार असून जिल्ह्यात बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व विभागांचा समन्वय ठेवून मोहिम यशस्वी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

याबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, शिक्षणाधिकारी एजाज खान, डॉ. सतीश हुमणे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, महापालिकेचे डॉ. विशाल काळे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, डॉ. प्रशांत घोडाम, जिल्हा होमगार्ड समादेशक आर. एम. बनसोड आदी उपस्थित होते.

पोलिओ लसीकरणात ग्रामीण भागात 1 लाख 33 हजार 493 व नगरपालिका, पंचायत क्षेत्रात 37 हजार 78 अशा एकूण 1 लाख 70 हजार 571 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. लसीकरणासाठी 2060 बुथ असतील. त्यातील 1 हजार 824 ग्रामीणमध्ये व 236 नगरपालिका क्षेत्रात असतील. त्याचप्रमाणे, वीटभट्टीवर काम करणारी कुटुंबे आदींपर्यंत पोहोचण्यासाठी 23 पासून पुढील तीन ते पाच दिवस मोहिम चालविण्यात येईल. सुमारे पाच लाख घरभेटींचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती डॉ. करंजीकर यांनी दिली.

                                     प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा

 प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत अद्यापपर्यंत 68 हजार 277 लाभार्थी आहेत. योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्या अधिकाधिक व्यक्तींना लाभ मिळवून द्यावा. प्रलंबित अर्जांचा वेळीच निपटारा करा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती मातेला आहार घेण्यास प्रोत्साहित करून आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणा-या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे यासाठी राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवली जाते.

                                                कोविड सुविधा वेबसाईट अधिक ‘युजर फ्रेंडली’ करा

कोविडकाळात नागरिकांना उपलब्ध उपचार सुविधा, खाटा आदींची माहिती मिळण्यासाठी कोविड सुविधा हे संकेतस्थळ कार्यान्वित झाले. त्याचा लाभही अनेक नागरिकांना झाला. तथापि, हे संकेतस्थळ अधिक युजर फ्रेंडली होणे आवश्यक आहे. यादीमध्ये ‘सर्च’चा पर्याय, आवश्यक तिथे ‘ड्रॉपडाऊन’ची सुविधा असणे आवश्यक आहे. त्यानुसार ते अद्ययावत करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले.

                        000

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती