आरोग्य सुविधा गावातच उपलब्ध होणे हा प्रत्येक गावकऱ्यांचा हक्क - पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर

 














आरोग्य सुविधा गावातच उपलब्ध होणे हा प्रत्येक गावकऱ्यांचा हक्क

- पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर

प्रजासत्ताकदिनी 17.65 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन

 

      अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी आज जिल्ह्यातील 17.65 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन केले.

अचलपूर तालुक्यातील आरोग्य वर्धिनी केंद्र, येसुर्णा येथील नवीन इमारत व निवासस्थानाचे लोकार्पण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आले. गावातील एकही नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नये, यासाठी येसुर्णा आरोग्य वर्धिनी केंद्र अत्यंत महत्तवपूर्ण आहे. गावकऱ्यांना गावातच सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आरोग्य केंद्रात आवश्यक वैद्यकीय सुविधा उभारण्यात याव्यात तसेच इमारतीच्या बांधकामातील राहिलेल्या कामांची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी, अशा सूचना त्यांना यावेळी दिल्या. गावाच्या विकासात्मक कामासाठी गावकऱ्यांनीही आग्रही असावे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी येथील प्रयोगशाळा, शस्त्रक्रियागृह, प्रसुती कक्ष, हिरकणी कक्ष आदींची जातीने पाहणी केली. या आरोग्य केंद्रासाठी स्व. वासुदेव काळे यांनी त्यांची जमीन उपलब्ध करुन दिली होती. त्याचे स्मरण म्हणून आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी त्यांची पत्नी आणि मुलाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

अचलपूर तालुक्यातील आरोग्य वर्धिनी उपकेंद्र,असदपूर येथील नवीन इमारतीचे लोकार्पण

        श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीचे बांधकाम तसेच येथे उपलब्ध आरोग्य सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत आणि निवासस्थानाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. आरोग्य सुविधा हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून प्रत्येकाला आपल्या गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी अशा आरोग्य केंद्राचे महत्त्व वादातीत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी खल्लार ते आसेगाव या रस्त्याच्या बांधकामाचे भूमीपूजन केले. या कामाची किंमत 12.55 कोटी एवढी आहे. तसेच अचलपूर तालुक्यातील खांडवी, मेंढवळ, पातुर्डा, नेर, नांदखेड, किनखेड, दर्यापूर, चांदूरबाजार या रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमीपूजनही यावेळी करण्यात आले. या कामाची एकूण किंमत 500 लक्ष एवढी आहे. या विकास कामांमध्ये आसेगाव ते दर्यापूर रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्यात येणार आहे. असदपूर येथील मिशनरी दवाखान्याकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचेही यावेळी भूमीपूजन करण्यात आले. या कामाची एकूण किंमत 10 लक्ष एवढी आहे.

     महिमापूर येथील ऐतिहासिक सात मजली पायविहीरची पाहाणी श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केली. या विहीरीचे बांधकाम अंदाजे तेराव्या शतकातले असून पुरातत्तव विभागाच्या राज्य संरक्षित स्मारकमध्ये (विहीर) याचा समावेश होतो. या विहीरीला 85 पायऱ्या असून ती 110 फुट खोल आहे. तसेच विहीरीच्या आत अकरा कमानी असून पाच चौक आहेत. ऐतिहासिक विहीरीचा बराचसा भाग खचत असून डागडूजीची अत्यंत आवश्यकता आहे. पुरातत्त्व विभागामार्फत या विहीरीच्या डागडूजीसाठी लवकरच कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली. श्रीमती ठाकूर यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली असून लवकरच या ऐतिहासिक विहीरीचे जतन करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

     आमदार बळवंतभाऊ वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, वैद्यकीय अधिकारी अभिजीत काळे तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

00000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती