मॉम ऑरगॅनिक मार्केट’चा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 







मॉम ऑरगॅनिक मार्केटचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेंद्रिय शेती उत्पादनांच्या विपणनाला बळ मिळेल

-   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 26 : कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनतर्फे संपूर्ण सेंद्रिय प्रमाणित भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य उत्पादनांची बाजारपेठ अर्थात मॉम ऑरगॅनिक मार्केटचा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज येथे झाला. विकेल ते पिकेलधोरणानुसार सेंद्रिय उत्पादनांसाठी स्वतंत्र बाजार व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नरत असून, ‘मॉम ऑरगॅनिक मार्केटमुळे त्याला बळ मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

 अमरावतीत चिलम छावणी परिसरात विद्यापीठ रस्त्यावर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर सेंद्रिय उत्पादनांचे मार्केट आजपासून सुरू झाले. उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधून उत्पादनांची माहिती घेतली. विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे, तहसीलदार संतोष काकडे, प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे, प्रकल्प संचालक संतोष आळसे, उपसंचालक आरिफ शाह, उपविभागीय कृषी अधिकारी दीप्ती रोडगे आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या सहा जिल्ह्यात कार्यरत असून, 395 शेतकरी गटांच्या माध्यमातून 36 जैविक शेती शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणीकृत आहेत. या सहाही जिल्ह्यात मॉम ऑरगॅनिक मार्केट सुरू होत आहेत.

 

              जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अचलपूर, चांदूर रेल्वे, तिवसा, धारणी येथील क्लस्टरमधून 50 गटांनी मिळून पाच जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यात 1 हजार 69 शेतकरी सदस्य आहेत. सेंद्रिय अन्नधान्य, भाजीपाला, फळे आदींना हक्काची बाजारपेठ मिळाल्याने नियमित विक्रीची सोय झाली आहे. कृषीमालाच्या विपणनासाठी मार्केट उपलब्ध असणे आवश्यक असते. कृषी विभाग व मिशनच्या माध्यमातून ही बाजारपेठ उपलब्ध झाल्याने मिशनमधील सहभागी शेतकरी बांधवांना बळ मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतकरी बांधवांसाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. ग्राहकांचे सातत्य राहण्यासाठी इतर क्षेत्रातून तांदूळ, गूळ आदी उत्पादनेही उपलब्ध ठेवावीत, अशी सूचना श्री. आळसे यांनी केली. श्री. शाह यांनी सूत्रसंचालन केले.

 

00000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती