अमरावती तालुका प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 






अमरावती तालुका प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

इमारतीचे काम फास्ट ट्रॅकवर पूर्ण करा

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 26 : जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आले असून, अनेक कामे पूर्णत्वास जात आहेत. या कामांत अमरावती तालुका प्रशासकीय इमारतीचे कामही महत्वाची उपलब्धी ठरेल. हे काम गुणवत्ता राखून फास्ट ट्रॅकवर पूर्ण करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

अमरावती तालुका प्रशासकीय इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता अरूंधती शर्मा, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ते, इमारती आदी पायाभूत सुविधांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. अमरावती तालुक्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी विविध कार्यालयांचा समावेश असलेली एक उत्तम इमारत उभी राहणार आहे. हे काम गुणवत्तापूर्ण आणि विहित वेळेत पूर्ण व्हावे. इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. विकासकामांसाठी निधीची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विविध कार्यालयांचा समावेश

तालुका प्रशासकीय इमारतीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल सेतू कार्यालय, मुद्रांक कार्यालय, लोकअदालत, भूमि अभिलेख तालुका निरीक्षक, तहसील कार्यालय, महसूल कार्यालय, उपकोषागार कार्यालय, तालुका निबंधक कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, प्रादेशिक वन कार्यालय, तालुका कृषी अधिकारी आदी कार्यालयांचा समावेश असेल. तळमजल्याचे 1 हजार 827.67 चौ. मी., तर पहिल्या मजल्याचे क्षेत्र 1 हजार 801.65 चौ. मी. असेल. या कामासाठी 14 कोटी 97 लक्ष रू. प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. काम पूर्ण कालावधी 10 महिने आहे.

 

00000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती