फिनले मिल सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी - कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 




फिनले मिल सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी

-     कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

                                            विविध विभागांचा घेतला आढावा

अमरावती,दि. 17:  अचलपूर येथील फिनले मिलमध्ये  मोठ्या संख्येने कामगार कार्यरत आहेत. असंख्य कामगारांची  उपजीविका  मिलवर अवलंबून आहे. ही मिल सुरु करण्यात यावी तसेच कामगारांचे थकित वेतन त्यांना देण्यात यावे. कामगार विभागाने त्यांच्या स्तरावर प्रस्ताव तयार करुन वस्त्रोद्योग विभागाकडे तात्काळ सादर करावा. मिलमधील सूत तयार करणारा विभाग व सुत विणून वस्त्र तयार करणारा विभाग प्राधान्याने सुरु करण्यात यावे यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश कामगार, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले.

फिनले मिल सुरू करण्याबाबत व कामगारांच्या थकित वेतन प्रदान करण्याच्या विषयावर  बैठक आज विश्राम भवनातील कक्षात आयोजित करण्यात आली. बैठकीला सहायक कामगार आयुक्त प्रशांत महाले, जिल्हा उदयोग केंद्राचे व्यवस्थापक उदय पुरी, उपव्यवस्थापक गिरीश सांगळे, शासकीय कामगार अधिकारी राहुल काळे, धर्मेंद्र पिंपलेवार, फिनले मिलचे महाव्यवस्थापक अमित कुमार सिंग, कारखाना प्रबंधक संदीप कुमार विश्वास आदी उपस्थित होते.

 कोरोना कालावधीत एप्रिल 2021 पासून मिल बंद आहे. कामगारांना 50 टक्के वेतन मिलच्या व्यवस्थापनाकडून प्रदान करण्यात येत आहे. परंतु मिल  बंद असलेल्या  काळातील पूर्ण वेतन कामगारांना प्रदान करण्यात यावे यासाठी मिलच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या आस्थापनेला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री. कडू यांनी दिले.  

कामगारांना कामगार कल्याण योजनेअंतर्गत योजना व सोयी सवलतींचा लाभ द्यावा

विकास प्रक्रियेत कामगारांचे  अमूल्य योगदान असते. त्यांना आवश्यक त्या सोयी सवलतीचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी मिलच्या आस्थापनेने  आवश्यक ते  प्रस्ताव सादर करून त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश श्री.कडू यांनी यावेळी दिले. कायम कामगार, बदली कामगार  व इतर कर्मचारी मिळून 827 कामगार या मिल मध्ये कार्यरत आहेत. कामगारांना मिळणाऱ्या सोयी सवलती अंतर्गत उपहारगृह, वैद्यकीय सेवा, अपघात विमा, कामगारांना किमान वेतनाप्रमाणे बँकेमार्फत वेतन तसेच कामगार कल्याण निधी योजनेचा लाभ वेळोवेळी देण्यात यावा, अशा सुचना संबंधितांना दिल्या.  

 

     अपंग बांधवाना रोजगार प्राप्त होण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करा

अपंगांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्या पद्धतीने आराखडा तयार करण्यात यावा. त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यावर आधारित  क्षेत्रात त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश श्री. कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील 300  ते 400 अपंग बांधवानी तयार केलेले कार्यालयीन कामकाजाचे साहित्य सर्व शासकिय कार्यालयांनी खरेदी करावे. अपंगांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत बैठक विश्राम गृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी संबंधितांना सुचना केल्या. यावेळी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी डॉ. उमेश टेकाडे व इतर विभागाचे ‍विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री. कडू म्हणाले, अपंगांना काम करीत असताना काही मर्यादा येतात. त्या बाबत आपण सहृदयतेने विचार करून रोजगाराच्या सर्व क्षेत्रात त्यांना समान संधी उपलब्ध करून देता येईल याबाबत विभागाने प्रयत्न करावे असे निर्देश दिले. कार्यालयीन कामकाजाच्या साहित्य निर्मिती बरोबरच शैक्षणिक साहित्यांची निर्मिती देखील अपंग बांधव करीत आहेत. त्या साहित्याच्या विक्री करण्याच्या दृष्टीने त्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देता येईल. सर्व शासकीय कार्यालयांनी शासकिय कामकाजाचे साहित्य अपंग बांधवांकडून खरेदी करावे. त्यासाठी आवश्यक ती कार्यालयीन प्रक्रिया पुर्ण करण्याची सुचना श्री. कडू यांनी केली.

000000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती