ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचणार - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर





जलजीवन मिशनमध्ये ३०० कोटींहून अधिक निधीला प्रशासकीय मान्यता

ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचणार

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 11 : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण ठरणा-या विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी  ३०० कोटींहून अधिक निधीला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याद्वारे प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, अभियान स्वरूपात ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

 

जिल्ह्यातील प्रस्तावित ग्रामीण पाणीपुरवठ्यांच्या कामांना मान्यता मिळावी यासाठी पालकमंत्र्यांकडून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा होत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत घरोघर नळजोडणीसाठी आवश्यक निधीसाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन व चर्चेद्वारे पाठपुरावा केला. त्यानुसार महत्वाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी ३०० कोटी ६२ लाख रूपये निधीला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

 

जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील  प्रत्येक कुटुंबाला सन २०२४ पर्यंत, वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. त्याअंतर्गत  जिल्ह्यातील महत्वाच्या योजनांसाठी निधीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेडोपाडी पाणीपुरवठा योजना निर्माण होण्यास वेग मिळणार आहे. आता प्रशासनानेही योजनेनुसार प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी अभियान स्वरूपात काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

 

ग्रामीण भागातील महत्वपूर्ण योजना

 

१५६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत अंजनगाव सुर्जी, दर्यापूर व भातकुली तालुक्यांतील १४४ गावांतील यंत्रणेचे बळकटीकरण व सुधारणांसह दरडोई दरदिवशी ५५ लीटर पाणी क्षमतेच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या २३ कोटी ६८ लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील १०५ गावे वाढीव पाणीपुरवठा योजनेत ५५ लीटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या १५८ कोटी ३१ लाख रूपये निधीस मान्यता देण्यात आली आहे.

 

चांदूर बाजार तालुक्यातील १९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या २० कोटी ३२ लाख रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे. बागलिंगा प्रकल्पावरून चिखलदरा तालुक्यातील १४ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी १८ कोटी ५८ लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.  अमरावती तालुक्यातील नांदगावपेठ व ३२ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस८१ कोटी ७३ लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.     

 

           ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत होणार आहेत. या योजनेतून प्रत्येक घरास नळजोडणी देणे आवश्यक आहे.  आतापर्यंत दिलेली नळजोडणी व पुढे द्यावयाच्या जोडण्यांबाबत आयएमआयएस प्रणालीवर माहिती नोंदविणे आवश्यक राहील. नवीन जोडणीचे आवश्यक नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची असेल. योजना स्वयंनिर्भर होण्यासाठी आवश्यक पाणीपट्टी निश्चित करणे व त्यात आवश्यकतेनुसार वाढ करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे.

 

           जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीकरिता योजनेच्या किमतीच्या १० टक्के रक्कम लोकवर्गणीच्या स्वरूपात ग्रामपंचायतीकडे ठेवणे आवश्यक आहे. ही रक्कम जमा करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेची राहील.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

 


 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती