नवमतदार विद्यार्थ्यांनी घेतली मतदार प्रतिज्ञा



















सर्वसमावेशक, सुलभ व सहभागपूर्ण निवडणूका

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त बचतभवनात कार्यक्रम

नवमतदार विद्यार्थ्यांनी घेतली मतदार प्रतिज्ञा

 

अमरावती, दि. 25 : ‘देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू, मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणूकांचे पावित्र्य राखू, प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे, तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करू, अशी प्रतिज्ञा विविध मान्यवरांसह अनेक नवमतदार विद्यार्थ्यांनी आज घेतली.

जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम बचतभवनात झाला. विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, रणजीत भोसले, तहसीलदार संतोष काकडे आदी उपस्थित होते.  

मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. देशात तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे देशाचे उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरुक असणे गरजेचे आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत तरूणांचा सहभाग वाढविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक प्रयत्न व्हावेत. तरूणांनीही पुढाकार घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी केले.

मतदान करणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. मतदान प्रक्रियेने समानतेचे तत्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे युवक, युवतींनी मतदार प्रक्रियेविषयी जागरूक राहिले पाहिजे. मतदार यादीत आपले नाव नसल्यास वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तत्काळ मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. विद्यापीठाचे  कुलसचिव डॉ. देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.  

निवडणूक आयोगाची स्थापना 1950 मध्ये झाली. भारतात दरवर्षी निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. यंदाची थीम  'निवडणुका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागी बनवणे' ही आहे. मतदारांना त्यांच्या मताच्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी हा उपक्रम साजरा होतो, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. फुलझेले यांनी सांगितले.

उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिका-यांचा गौरव

अमरावती विभागातून उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रणजीत भोसले व तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी संतोष काकडे यांचा गौरव यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे, शिल्पा अब्रूक, ज्ञानेश्वर टाले, दीपक लव्हाळे, इमरान , नसीम अहमद खान मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

 

विविध स्पर्धांतील गुणवंतांचा गौरव

मतदार जनजागृतीसाठी निवडणूक कार्यालयाने आयोजिलेल्या विविध स्पर्धा उपक्रमांतील गुणवंतांना यावेळी गौरविण्यात आले. चित्रकला स्पर्धेत समता गुडधे (राम मेघे फार्मसी कॉलेज) यांनी पहिल्या, अश्विनी शिवदास बाभुळकर (शिवाजी विज्ञान कॉलेज) यांनी दुस-या व तृप्ती कांडलकर (नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा) यांनी तिस-या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. रांगोळी स्पर्धेत विद्याभारती महाविद्यालयाच्या ऋतुजा गोडे, अवंती धर्मासरे व प्रिया राऊत यांना अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाची बक्षीसे मिळाली.

निबंध स्पर्धेत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या सलोनी कळसकर, सेजल सनके व अंजना कुशवाह यांना अनुक्रमे पहिली तीन बक्षीसे मिळाली. वक्तृत्व स्पर्धेत विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या सुचिता नांदुरकर, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या तुषार पडोळे व तक्षशीला महाविद्यालयाच्या गायत्री सरोदे यांना अनुक्रमे पहिली तीन पारितोषिक मिळाली. आयुष अटल, पूजा भांडे, निमिषा राठी व स्तुती राठी या नवमतदारांना ओळखपत्रांचे वितरणही यावेळी झाले.

00000

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती