‘ऊर्जा कार्यक्षम कार्यक्रमा’द्वारे शासकीय शाळांत 30 टक्के वीज बचत

 







‘महाऊर्जा’चा उपक्रम

‘ऊर्जा कार्यक्षम कार्यक्रमा’द्वारे शासकीय शाळांत 30 टक्के वीज बचत

अमरावती, दि. 8 : ‘मेडा’तर्फे शासकीय शाळांच्या इमारतींत राबविण्यात येणा-या ‘ऊर्जा कार्यक्षम कार्यक्रमा’द्वारे वीजेच्या वापरात 30 टक्के बचत होऊ लागली असून, अमरावती जिल्ह्यातील सहा शाळांमध्ये हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे, अशी माहिती ‘मेडा’चे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल व. तायडे यांनी दिली.  

केंद्र शासनाचे ऊर्जा दक्षता ब्युरो व महाराष्ट्र शासनाचे ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमात 2021-22 मध्ये अमरावती जिल्हा परिषद व महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण सहा शाळांची निवड करण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेच्या अमरावती येथील उर्दू गर्ल्स हायस्कुल व वाढोणा रामनाथ येथील जि. प. शासकीय माध्यमिक शाळा या दोन शाळांचा समावेश आहे. महापालिकेच्या गाडगेनगरातील  उच्च प्राथमिक शाळा, भाजीबाजारातील उच्च प्राथमिक शाळा,  वडाळी येथील उच्च प्राथमिक शाळा व जमिल कॉलनीतील उर्दू माध्यमिक  शाळा या चार शाळांचा समावेश आहे.

                                    जुनी वीज उपकरणे बदलली

या उपक्रमाद्वारे या सहा शाळांमधील जुने व अधिक वीज लागणारे पंखे, दिवे, ट्युबलाईट व इतर उपकरणे बदलण्यात येऊन त्याऐवजी ऊर्जा कार्यक्षम पंखे, दिवे, ट्युबलाईट व इतर उपकरणे पुरविण्यात आली. ऊर्जा कार्यक्षम उपकरणे बसविल्याने ऊर्जा बचत होऊ लागली आहे. शाळांच्या वीज देयकांत 30 टक्क्यांहून अधिक बचत होऊ लागली आहे.

                                    पाच वर्षांपर्यंत करणार देखभाल

या कार्यक्रमात पुढील पाच वर्षांपर्यंत या सर्व शाळांमधील वीज उपकरणांची देखभाल, दुरूस्ती ‘मेडा’तर्फे करण्यात येणार आहे. यापुढील काळात महापालिकेच्या 5 व जिल्हा परिषदेच्या 5 अशा 10 शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे.

 विभागीय महाव्यवस्थापक श्री. तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी हर्षल काकडे व टीमकडून हा उपक्रम राबविण्यात आला.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती