‘एक हात मदतीचा’ कुटुंबांना धीर देणारा ठरेल - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

 

 













‘एक हात मदतीचा

कुटुंबांना धीर देणारा ठरेल

                                                          -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

 

अमरावती, दि. 24 : कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये घरातील प्रमुख गमाविलेल्या वंचित परिवारातील महिला व बालकांना ‘एक हात मदतीचा’ हा कार्यक्रम आर्थिक मदतीसह आपण एकटे नाहीत या भावनेमुळे धीर देणारा ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे व्यक्त केला.

महिला आर्थिक विकास महामंडळ, रामचंद्र युवक कल्याण संस्था, मोझरी, सह्याद्री फाऊंडेशन स्वयंसेवी संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक हात मदतीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याअंतर्गत कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये घरातील प्रमुख तसेच कमावती व्यक्ती गमावलेल्या वंचित परिवारातील महिला व बालकांना नवव्यवसाय तसेच उदनिर्वाहासाठी नविन सुरवात व्हावी यासाठी आर्थिक मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला तीस हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीसह आमदार बळवंत वानखेडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, नगर सेवक विलास इंगोले, सह्याद्री फाऊंडेशनचे विजय क्षीरसागर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे तसेच माजी आमदार विरेंद्र जगताप, नरेशचंद्र ठाकरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसागडे आदी यावेळी उपस्थित होते.

एक हात मदतीचा हा भावनिक असल्याचे सांगून महसूलमंत्री श्री थोरात म्हणाले की, कोविडच्या लाटेमध्ये घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अनेक कुटुंबांचा आधार गेला. कोविडची पहिली लाट ओसरत असतांनाच अमरावती शहरातून दुसऱ्या लाटेची सुरवात झाली. अश्यावेळी आरोग्य, पोलीस, महसूल विभाग  तसेच आशा वर्कर्स व अन्य शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. यातून दुसऱ्या लाटेला परतून लावण्यासाठी अमरावतीकरांचे प्रयत्न यशस्वी ठरले. तरीदेखील ज्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे निधन झाले आहेत त्यांच्यासाठी एक हात मदतीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नविन सुरवात करण्यासाठी  निश्चितच मदत होईल. कोविडचे संकट कमी झाले असले तरी अजूनही टळले नाही यासाठी प्रत्येकाने कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महिला व बाल विकासामार्फत कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांना दर महिन्याला आर्थिक मदत पुरविली जाते. एक हात मदतीचा या कार्यक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील 192 कुटुंबांना 57 लाख 60 हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे. तसेच येथील स्वयंसेवी संस्था देखील या कार्यात पुढाकार घेत असल्याचे समाधान श्री थोरात यांनी यावेळी व्यक्त केले.

स्वत:ला खंबीर बनवा, असा संदेश देत श्रीमती ठाकुर म्हणाल्या घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबातील महिलांची जाबाबदारी दुहेरी झाली आहे. अश्यावेळी स्त्रीयांनी खंबीर होणे गरजेचे आहे. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करा. स्वत:च्या आर्थिक निर्णयाच्या बाबतीत सक्षम व्हा. कुणावर विसंबून न राहता स्वत:ला सिध्द करा. अशांच्या पाठीशी प्रसासन तसेच पालकमंत्री या नात्याने मी सदैव पाठबळ देत राहील असा खंबीर विश्वास त्यांनी यावेळी दिला.

प्रातिनिधीक स्वरुपात यावेळी महिलांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल सोसे यांनी तर संचालन प्रिती गवई यांनी केले.

                                                          0000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती